१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेमसह अन्य सहा जणांना मुंबईतील विशेष टाडा न्यायालय ७ सप्टेंबररोजी शिक्षा सुनावणार आहे. यातील मुस्तफा डोसाचा जूनमध्ये तुरुंगात मृत्यू झाला असून उर्वरित पाच दोषींना विशेषतः अबू सालेमला न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयाने जून महिन्यात सहा जणांना दोषी ठरवले होते. मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दुल रशिद खान, करिमुल्ला खान ऊर्फ हुसेन हबीब शेख, ताहिर महोम्मद मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या, रियाझ सिद्दिकी या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले. तर अब्दुल कय्यूम करिम शेख या आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. बॉम्बस्फोटांसाठी सालेमने गुजरातमधून मुंबईत शस्त्रसाठा आणला होता. जूनमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले असले तरी या सर्वांना शिक्षा काय होणार यावर न्यायालयाने निकाल दिला नव्हता. अबू सालेमचे प्रत्यार्पण करताना त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, अशी अट पोर्तुगाल सरकारने घातली होती. त्यामुळे सालेमला ७ सप्टेंबररोजी न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. २४ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटात जगात पहिल्यांदाच ‘आरडीएक्स’सारख्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. स्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसह खटल्यातील ३३ आरोपी अद्यापही फरार आहेत.

बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी काहींना खटल्याच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असताना अटक झाली होती. तर काहींना खटल्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर अटक करण्यात आली. त्यामुळे या आरोपींविरोधात पहिल्या टप्प्यातील कामकाजादरम्यान समोर आलेला पुरावा ग्राह्य धरावा की स्वतंत्रपणे म्हणजे पहिल्यापासून पुरावा नोंदवावा यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर त्यांच्याविरोधात स्वतंत्र खटला चालवण्याचे निश्चित झाल्यावर २०११ मध्ये त्यांच्यावर नव्याने खटला चालवण्याचे काम सुरू झाले.