कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे कायदेशीररित्या बंदी असलेली एखादी छोटी वस्तू देखील विमानातून नेणे अशक्य असते. मात्र, सरकारी मालकीच्या ‘एअर इंडिया’ कंपनीच्या विमानातच ‘गांजा’ हा अंमलीपदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका क्रू मेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेन्नई विमानतळाहून उड्डाण केलेल्या एका विमानात हा प्रकार घडला आहे.


एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्यांच्या जेवण पुरवणाऱ्या छोट्या गाडीमध्ये तब्बल २ किलो गांजा आढळून आला आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान हा गांजा आढळून आला. त्यानंतर एका क्रू मेंबरला त्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

३० जुलै रोजी केंद्रीय बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी गांजाला वैद्यकीय उपचारांसाठी देशात कायदेशीररीत्या मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली होती.

साधारण वर्षभरापूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर युजो इग्वे फर्टिनंड मेलडी (वय २६) नामक नायजेरियन व्यक्तीला बनावट पारपत्र बाळगण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने नागपुरात पिंटू ओस्तवाल नावाच्या व्यक्तीला कोकेन पुरवठा करण्यासाठी आल्याची कबुली दिली होती. त्यावेळी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत अंमलीपदर्थांचे रॅकेट उद्धस्त केले होते.

‘कोकेन’ हा महागडा अंमलीपदार्थ आहे. त्यामुळे कोकेनची नशा करणारे हे प्रामुख्याने उच्चभ्रू लोक असतात. नागपूर शहरात उघडकीस आलेल्या डब्बा व्यापाऱ्यांशी याचा संबंध असल्याची माहिती समोर आली होती. पिंटू हा अनेक डब्बा व्यापाऱ्यांच्या संपर्कात होता. तोच डब्बा व्यापाऱ्यांना कोकेन पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.