छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतील जवळपास २०० गायींचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. उपासमार आणि योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्ग जिल्ह्यातील राजपूर गावातील गोशाळेतील २०० गायी दगावल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. संबंधित गोशाळा भाजपचे नेते हरिश वर्मा यांच्या मालकीची आहे. मृत पावलेल्या २०० गायींपैकी २७ गायींचा मृत्यू उपासमारीने झाला असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. मात्र इतर गायींच्या मृत्यूमागील कारणाबद्दल अद्याप तरी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

गोशाळेतील २०० गायींचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतांश गायींचे दफन गोशाळेजवळच करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ज्या गायींचे दफन करण्यात आले नाही, त्यांचे मृतदेह गोशाळेजवळ पाहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित गोशाळा भाजप नेते हरिश वर्मा यांची असून ते जमुल नगरपालिकेचे उपाध्यक्ष आहेत. मागील सात वर्षांपासून वर्मा गोशाळा चालवत आहेत.

‘आम्हाला गोशाळेजवळ दोन दिवसांपूर्वी जेएसबी मशीन काम करताना दिसल्या. त्यानंतर आम्ही या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दिली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा आम्हाला मृत गायींचे दफन करण्यासाठी खंदक खणण्याचे काम सुरु असल्याचे दिसले. त्यावेळी जवळपास २०० गायी तेथे मृतावस्थेत पडलेल्या होत्या,’ अशी माहिती राजपूरच्या सरपंचाचे पती सेवा राम साहू यांनी दिली. घटनास्थळी असलेल्या डॉक्टरांनी उपासमार आणि औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गायींचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

भाजप नेते हरिश वर्मा यांनी मात्र गायींचा मृत्यू उपासमारीमुळे झाला नसल्याचे म्हटले. दोन दिवसांपूर्वी भिंत कोसळल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. दुर्ग जिल्ह्याचे पशुवैद्यकीय संचालक असलेल्या एम. के. चावला यांनी गायींचा मृत्यू अपुरा चारा मिळाल्याने झाल्याचे म्हटले. ‘गायींच्या मृत्यूमागे चाऱ्याचा अपुरा पुरवठा असल्याचे प्राथमिक निरीक्षणानंतर दिसत आहे. मागील २ दिवसांमध्ये २७ गायींचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यातून उपासमारीमुळेच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे,’ असेही चावला यांनी सांगितले.