बिहारमध्ये राहणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते….मात्र प्रियकराने १ लाख ८० हजार रुपये दिल्यावरच लग्न करणार असे सांगितले…प्रियकराची ही अट पूर्ण करण्यासाठी तिने थेट दिल्ली गाठली…एका रुग्णालयात ती किडनी विकणार होती…मात्र रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला आणि पुढील अनर्थ टळला.

बिहारमध्ये राहणारी २१ वर्षीय तरुणीचे घटस्फोट झाले आहे. घटस्फोटानंतर ती आई- वडिलांच्या घरी राहत होती. याच दरम्यान तिची गावातील एका तरुणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. तरुणीच्या आई- वडिलांनी लग्नाला विरोध दर्शवला होता. मात्र तरुणी तिच्या प्रियकराला सोडण्यास तयार नव्हती. तिचा प्रियकर उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे कामाला असून पीडित तरुणी घर सोडून प्रियकराकडे गेली. मात्र १ लाख ८० हजार रुपये दिल्यावर लग्न करणार अशी अट प्रियकराने घातली. क्षणाचाही विचार न करताना तरुणी प्रियकराची मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्लीत पोहोचली.

दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयात जाऊन तिने किडनी विकायची आहे, असे सांगितले. रुग्णालयातील डॉक्टरांना यामध्ये किडनी रॅकेटचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणीची चौकशी केली आणि सर्व प्रकार उघड झाला. पीडित तरुणीने प्रियकराविरोधात तक्रार करावी, अशी विनंती पोलिसांनी केली. मात्र तरुणीने तक्रार करण्यास नकार दिला. शेवटी बिहारमध्ये राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी दिल्लीत येऊन मुलीला घरी परत नेले.