कोणी कोणते आडनाव लावावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मुळातच बायकांनी लग्न झाल्यानंतर नाव-आडनाव बदलण्याची गरज आहे का, याचे उत्तर नव्या पिढीच्या युवतींनी ‘नाही’ असे दिले आहे. एवढेच नव्हे, तर लग्नानंतर त्यांच्या नावामागे सासरचे आडनाव लावण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ४० टक्के अविवाहीत भारतीय मुलींनी लग्नानंतर त्यांचे आडनाव बदलण्यास नकार दिला आहे.
शादी डॉट कॉम या वरवधु संशोधन केंद्राने अलीकडेच संपूर्ण भारतात सर्वेक्षण केले. यावेळी त्यांनी अविवाहीत मुलींना लग्नाबद्दल त्यांचे मतप्रदर्शन करण्यास सांगितले. लग्नानंतर तुम्हाला तुमचे आडनाव बदलायला आवडेल का, लग्नानंतर आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र राहायला आवडेल का, कौटुंबिक जबाबदारी आणि इतर अनेक प्रश्न यावेळी त्यांनी या मुलींना विचारले. त्यावेळी सुमारे ४०.४ टक्के अविवाहीत भारतीय मुलींनी लग्नानंतर त्यांना त्यांचे आडनाव बदलायला आवडणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. पूर्वापार चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत लग्नानंतर मुलींचे आडनावच नव्हे, तर नावसुद्धा बदलवले जात होते. आधुनिक काळात चालीरिती, संस्कृतीला बगल देत मुलींनी त्यांच्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात केली. विशेषत: नोकरी करणाऱ्या मुलींनी लग्नानंतर त्यांचे माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लावण्यासही सुरुवात केली आहे. मात्र, शादी डॉट कॉमच्या सर्वेक्षणात तर चक्क त्यांनी माहेरचे आडनाव बदलून सासरचे आडनाव लावण्यास नकार दिला आहे.
या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या इतर २७ टक्के अविवाहीत भारतीय मुलींनी लग्नानंतर त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र राहायला आवडेल, असे मत नोंदवले आहे. आज प्रत्येक मुलगी शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसाय करण्याच्या मागे आहे. त्यामुळे लग्नाच्या आधीपासूनच आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झालेल्या या मुलींना लग्नानंतरही नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा प्रदर्शित केली. १४ टक्के अविवाहीत भारतीय मुलींनी त्या जर नवऱ्याच्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकतात, तर नवऱ्यानेसुद्धा त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी स्वीकारावी, असे मत व्यक्त केले. मोठय़ा शहरांमध्ये साधारणपणे अशी उदाहरणेसुद्धा दिसायला लागली आहेत. १८ टक्के अविवाहीत भारतीय मुलींनी कुटुंबाची जबाबदारी तिने एकटीनेच न उचलता नवऱ्यानेसुद्धा समान जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले. शादी डॉट कॉमने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणाला २४ ते ३८ वयोगटातील सुमारे ११ हजार २०० अविवाहीत भारतीय मुलींनी प्रतिसाद दिला. लग्न झालेल्या महिलांना जेव्हा त्यांच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा सुमारे ३० टक्के महिलांनी पालकांच्या दबावामुळे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. महिलांनी सशक्त आणि स्वतंत्र असायलाच पाहिजे, असे मत यावेळी शादी डॉट कॉमचे मुख्य अधिकारी गौरव रक्षित यांनी व्यक्त केले.