यंदाच्या वर्षात देशाच्या विविध भागांमध्ये ७३ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने ही आकडेवारी जाहीर केली असून मध्य प्रदेशात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत मध्य प्रदेशात १८ वाघांनी जीव गमावला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकचा क्रमांक लागतो. यंदाच्या वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत कर्नाटकात १४ वाघांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेश आणि कर्नाटकसोबतच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील वाघांच्या मृत्यूची आकडेवारीदेखील चिंताजनक आहे. वृद्धावस्थेत होणारे आजार, विजेचा धक्का, रस्ते-रेल्वे अपघात ही वाघांच्या मृत्यूंमागील प्रमुख कारणे आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी भारतात १०० वाघांचा मृत्यू झाला होता. २००९ ते २०१९ पर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारतात दरवर्षी सरासरी ६७ वाघ दगावतात.

वाघांच्या संरक्षणात यंदाच नव्हे, तर गेल्या पाच वर्षांमध्येही मध्य प्रदेशची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मध्य प्रदेशात एकूण ८९ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ बछड्यांचा समावेश होता. दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वाघांचे मृत्यू होत असल्याने व्याघ्रप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांच्या एका पथकाने भारतातील वाघांच्या माहितीचे विश्लेषण केले. देशातील दोन वाघांच्या जीवाचे मूल्य मंगळयान मोहिमेसाठी आलेल्या खर्चापेक्षाही अधिक असल्याचे या पथकाने विश्लेषणातून स्पष्ट केले. दोन वाघांचे संवर्धन आणि देखभालीतून भारताला होणारा फायदा ५२० कोटी रुपये आहे. तर मंगळयान मोहिमेच्या तयारीसाठी आलेला एकूण खर्च ४५० कोटी रुपये होता. भारतातील वाघांची संख्या २,२२६ इतकी आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धन आणि देखभालीतून देशाला मिळणारा एकूण फायदा ५.७ लाख कोटी रुपयांचा असेल, असे विश्लेषण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांच्या पथकाने केले.