तृणमूलच्या दोन उमेदवारांविरुद्ध एफआयआर दाखल; कडेकोट सुरक्षाव्यवस्था

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या व अखेरच्या टप्प्यात गुरुवारी ८४.२४ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी तृणमूल काँग्रेस व माकपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली तृणमूलच्या दोन उमेदवारांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.

पूर्व मिदनापूर व कूचबिहार जिल्ह्य़ांमध्ये मतदान झालेल्या या टप्प्यात १८ महिलांसह १७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच कूचबिहार जिल्ह्य़ातील सीमेलगतच्या अंत:क्षेत्रातील (एन्क्लेव्ह) ९७७६ जणांनी मतदान केले. या अंत:क्षेत्रांचा गेल्या वर्षी भारतीय हद्दीत औपचारिकरीत्या समावेश झाला होता. यापैकी १०३ वर्षांचे असगर अली हे त्यांच्या तीन पिढय़ांतील प्रतिनिधींसह पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी आले होते. पूर्व मिदनापूर जिल्ह्य़ातील मोयना मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते एका मतदान केंद्राजवळ शस्त्रास्त्रांसह जमल्याची, तर तीन मतदान केंद्रांमध्ये शिरकाव केल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोंदवली. याच मतदारसंघात मतदारांना अन्नवाटप केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना सुरक्षा दलांनी पकडले. तृणमूल काँग्रेस व काँग्रेसशी संबंधित दोन गट कथितरीत्या मतदारांना जेवण वाटत होते. सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केल्यानंतर बहुतेक जण पळून गेले, परंतु हे पाच जण त्यांच्या हाती लागले. कूचबिहारमधील नाटाबारी मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि माकप यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या.

तृणमूल उमेदवारांचा हस्तक्षेप

कूचबिहार जिल्ह्य़ात कथितरीत्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याच्या, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन उमेदवारांविरुद्ध एफआयआर दाखल केला. नाटाबारी येथील तृणमूलचे उमेदवार रवींद्रनाथ घोष यांनी मतदान सुरू असताना मतदान कक्षात (कंपार्टमेट) प्रवेश करून गोपनीयतेचा भंग केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान केंद्राध्यक्षाला धमकी दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. दिनाहाटा येथे मतदान कक्षात प्रवेश करून गोपनीयता भंग केल्याच्या, तसेच पोलिसांना त्यांचे कर्तव्य करण्यात अडथळा आणल्याबद्दल तृणमूलचे उमेदवार उदयन गुहा यांनी कारवाई ओढवून घेतली. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.