इटलीचा काही भाग बुधवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. यामध्ये आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाल्याची तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली असून, भूकंपामुळे पडझड झाल्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान इटलीतील अमात्रिचे शहराचे झाले असून, पडझडीमुळे निम्म्याहून अधिक इमारती दिसतच नसल्याचे शहराच्या महापौरांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या शहरापासून जवळच असलेल्या अक्कुमोलीमध्येही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, तिथे चौघांचे एक कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
इटलीतील स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवू लागले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.२ इतकी होती. सुमारे २० सेकंद धक्के तीव्रपणे जाणवत होते. इटलीच्या मध्यवर्ती भागातील इमारतीही या धक्क्यांनी हादरत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इटलीच्या ईशान्यकडील भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिथे सर्वाधिक हानी झाली आहे. नागरी संरक्षण दलाच्या प्रमुखांनी या भूकंपाची तुलना २००९ मधील भूकंपाशी केली आहे. त्यावेळी इटलीतील भूकंपात ३०९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अमात्रिचे शहरात युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भूकंपामुळे शहरातील रस्त्यांनाही मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दळणवळणातही अडचणी येत आहेत. भूकंपामुळे काही भागात दरड कोसळली असून, काही पूलही तुटले आहेत, असे अमात्रिचेचे महापौर सर्जिओ पेरोझ्झी यांनी सांगितले.