अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात शनिवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ३३ ठार, तर १०० जण जखमी झाले आहेत. वेतनाचे पैसे घेण्यासाठी बँकेत रांग लावून उभे असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
   दरम्यान, या हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केला आहे. हा भ्याड हल्ला असून, त्यात निरपराध लोकांचे बळी गेले आहेत त्याचे समर्थन करता येणार नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. निरपराध नागरिकांना ठार करणारा हा दहशतवादी हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.  
   विभागीय रुग्णालयाचे डॉ. नजीबुल्ला कमावाल यांनी सांगितले, की तीन मृतदेह व १०० जखमींना रुग्णालयात आणण्यात आले. प्रांतिक सरकारचे प्रवक्ते अहमद झिया अब्दुलझाई यांनी सांगितले, की नोव्हेंबरपासूनचा हा सर्वात भीषण हल्ला होता. हल्लेखोरांनी स्फोटके अंगावर बाळगली होती की मोटारीत ठेवली होती याचा तपास केला जात असून, प्रत्यक्ष आत्मघाती व्यक्ती तिथे होती किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.
तालिबानी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी नाकारली असून, परदेशी सैनिकांवर आधी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेची जबाबदारी मात्र स्वीकारली आहे. इस्लामी प्रवक्ते झबिउल्ला मुजाहिद यांनी सांगितले, की आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. २००१ मध्ये तालिबान्यांना सत्तेवरून हाकलल्यानंतर नाटोच्या अगदी थोडय़ाशा पाठिंब्यावर आता अफगाण सैन्य लढत आहे. नाटोचे १ लाख ३० हजार सैनिक आधी अफगाणिस्तानात होते ते आता काही हजारांइतकेच आहेत व तेही अफगाणी संरक्षण दलांना विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करतात.