भारताने मंगळ व चांद्र मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुढच्या आंतरग्रहीय मोहिमेचा विचार सुरू केला आहे, त्यात शुक्रावर अंतराळ यान पाठवण्याच्या योग्यतेबाबत अभ्यास करण्यासाठी  यू.आर.राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
इस्रोचे अध्यक्ष ए.एस.किरणकुमार यांनी सांगितले की, शुक्र व इतर ग्रहांचा या मोहिमांसाठी विचार सुरू आहे. त्याबाबतची तपासणी करण्यासाठी अवकाश वैज्ञानिक यू.आर.राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. भारताची चांद्रयान १ मोहीम २००८ मध्ये यशस्वी झाली होती व त्यात चंद्रावर पाणी असल्याचे सांगण्यात आले होते. चांद्रयान २ मोहीम येत्या दोन-तीन वर्षांत राबवली जाईल. इस्रोचा अग्रक्रम काय असावा हे ठरवण्यासाठी यू.आर.राव यांची समिती नेमण्यात आली आहे. येत्या अडीच वर्षांत शुक्रावर अवकाशयान पाठवले जाण्याची शक्यता किरणकुमार यांनी व्यक्त केले. समितीने योजनेला मान्यता दिली तर ही मोहीम राबवली जाईल असे किरणकुमार यांनी सांगितले. इस्रो पुढील दिशादर्शन उपग्रहांसाठी अणुघडय़ाळ तयार करीत आहे पण सध्या अणुघडय़ाळ युरोपकडून खरेदी करावे लागत आहे. अणुघडय़ाळामुळे कंप्रता व काळ अधिक अचूक मोजला जातो त्यामुळे ते आयआरएनएसएस उपग्रहांसाठी उपयुक्त आहे. सध्या आपल्या देशात अणुघडय़ाळाचे नमुने तयार केले जात आहेत पण ते अंतिम पातळीवर पूर्ण होईपर्यंत वेळ लागेल त्यामुळे नंतरच्या उपग्रहांमध्येच त्याचा वापर केला जाऊ शकेल.