‘इथपर्यंत येण्यासाठी मी अनेक नरकं पार केली आहेत.’
‘विकटन’ या तमिळ साप्ताहिकाने गेले महिनाभर जयललिता यांच्या जीवनावर लेखमाला चालविली आहे. त्यातील पहिल्याच लेखातील हे पहिलेच वाक्य. खुद्द जयललितांचे उद्धरण म्हणून दिलेले. तमिळनाडूच्या आधुनिक सम्राज्ञी आणि अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेच्या आयुष्याची व कारकीर्दीची कहाणी याहून अधिक समर्पक शब्दांत सांगणे कठीण आहे.

आपल्या प्रवेशाने लाखो लोकांना हरखून टाकण्याची आणि जाण्याने तेवढ्याच लोकांना चटका लावण्याची क्षमता जयललितांमध्ये नक्कीच होती. त्यांचा जन्म अयंगार ब्राह्मण परिवारातला. म्हैसूरच्या महाराजांच्या डॉक्टरांची त्या नात होत्या. कोमलवल्ली हे त्यांचे मूळ नाव. आजोबांच्या मृत्यूनंतर आई संध्या (मूळ नाव वेदवल्ली) आणि कोमलवल्ली चेन्नईला आल्या. संध्या चित्रपटांत छोटी-मोठी कामे करून चरितार्थ चालवत असे. जयललितांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आणि लगेच त्यांचा चित्रपटांत प्रवेश झाला.
‘चिन्नद गोंबे’ या कन्नड चित्रपटांतून जयललितांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला. ‘वेन्निरा आडै’ (विधवेची वस्त्रे) हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट. एमजीआर नामक नटवराच्या पारखी नजरेने या नव्या तारकेतील चमक हेरली आणि त्यांना ‘आयिरत्तिल ओरुवन’ या चित्रपटात संधी मिळाली. त्यानंतर दोघांची जोडी जमली आणि रसिकांनी दोघांनाही डोक्यावर घेतले. जयललितांनी काम केलेल्या सुमारे ११५ चित्रपटांतील २८ चित्रपट या दोघांच्या जोडीचे आहेत. त्या चित्रपटाच्या यशामुळे एमजीआर आणि जयललितांमधील जवळीक वाढली.

lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
kolhapur lok sabha marathi news, hatkanangale marathi news
सन्मान नाही तोवर प्रचार नाही; संजय पाटील यांची धैर्यशील माने यांच्यावर नाराजी

अभिनेत्री म्हणून जयललितांची कारकीर्द फारशी उठावदार नव्हतीच. १९९२ साली आलेला ‘निंग नल्ला इरुक्कनुम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. हिंदीत त्यांनी ‘इज्जत’ चित्रपटात धर्मेंद्रबरोबर काम केले होते. जयललितांचे आज हाडवैरी असलेले करूणानिधी हे एमजीआर यांचे जवळचे सहकारी. ते स्वतः लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध होते. करुणानिधी यांनी चित्रपटाची पटकथा व संवाद लिहायचे, त्यावर एमजीआर यांनी अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळवायची आणि द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षाचा प्रचार करायचा, असे ते सूत्र होते. द्रविड चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मात्र द्रमुकचे संस्थापक अण्णादुरै यांच्यानंतर करुणानिधी यांनी पक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे या दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला. तशात करुणानिधींना इंदिरा गांधींचे सहकार्य मिळाले आणि पक्षावर त्यांची मांड बसली. तेव्हा त्यांनी आपला मुलगा एम. के. मुथ्थु याला वारसदार म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न चालविले. त्यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाला एमजीआर यांनी वाचा फोडली. एमजीआर यांनी १९७२ साली पक्षाच्या अधिवेशनात खर्चाचा हिशोब मागितला. त्याची प्रतिक्रिया म्हणून एमजीआर यांची द्रमुकमधून हकालपट्टी झाली.

त्यावेळी एमजीआर यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम पक्ष स्थापन केला. त्यावेळी अन्य सहकाऱ्यांसह त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या पडद्यावरील जोडीदार जयललिता. एमजीआर यांच्यापे‍क्षा त्या ३१ वर्षांनी लहान. करुणानिधीसारख्या भाषाप्रभू नेत्याला टक्कर देण्यासाठी एमजीआर यांना तशाच तोलामोलाची व्यक्ती हवी होती. फारशा शिकलेल्या नसूनही अफाट वाचन आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांच्या जोरावर जयललितांनी राजकीय समज विकसित केली होती. त्यामुळे आपसूकच जयललितांकडे अण्णा द्रमुकच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याकडे पक्षाचे प्रचार सचिव हे पद देण्यात आले.

कमावलेला चाणाक्षपणा, धीटपणा आणि माहिती यांच्या जोरावर जयललितांनी द्रमुकच्या तोडीस तोड काम करायला सुरवात केली. अण्णा द्रमुकच्या यशात त्यामुळे जशी भर पडत गेली, तशीच एमजीआरही त्यांच्यावर अधिकाधिक अवलंबून राहायला लागले. त्याचा परिणाम म्हणून अण्णा द्रमुक पक्षात त्यांच्याबद्दल कुजबुज वाढत गेली. पक्ष वाढवायचा असेल, तर जयललितांना दूर ठेवावे लागेल, असे अन्य नेत्यांनी सांगितल्यामुळे एमजीआरनी त्यांना हातभर अंतरावर ठेवायला सुरवात केली. पुरूष नेत्यांमुळेच हे घडले, ही बाब त्या कधीही विसरल्या नाहीत. त्याचे वारंवार उट्टे काढत त्यांनी त्याचे जाहीर प्रदर्शनही केले.

एमजीआरकडून मिळणारी ही वागणूक जयललितांना धक्कादायक होती. त्यामुळे त्यांनी शोभनबाबू या तेलुगु अभिनेत्यासोबत जवळीक वाढविली. परंतु हेही नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे १९८२ च्या सुमारास, एमजीआर आणि जयललिता परत एकत्र आले.

एमजीआरचे नाव घेऊन आणि त्यांच्यामुळेच तमिळनाडूची सत्ता भोगत असल्या, तरी जयललिता आणि त्यांचे संबंध कधीच सुरळीत नव्हते. १९८३ मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. याचे एक कारण असे होते, की जयललितांच्या हेतूंबद्दलच एमजीआरना शंका होती. त्यांच्या महत्त्वाकांक्षा ते पूरेपूर ओळखून होते. आज जयललितांच्या खासमखास असलेल्या शशिकला यांनाच एमजीआरनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी नियुक्त केले होते! स्वतःच्या अपरोक्ष अण्णा द्रमुकची सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न जयललिता करत असल्याचा एमजीआरना संशय होता. त्यासाठी ही योजना होती.

१९८४ साली एमजीआरना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेत नेण्यात आले. त्यावेळीच मुख्यमंत्री होण्यासाठी जयललितांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि राज्यपाल एस. एल. खुराना यांच्याशी संधान साधले होते. तेव्हा एमजीआरनी त्यांच्याकडून संसदीय पक्ष उपनेतेपद काढून घेतले. त्यानंतर एमजीआरच्या मृत्यूपूर्वी एक वर्ष, १९८६ साली, त्यांनी ‘जयललिता पेरवै’ (जयललिता परिषद) स्थापन केली. १९८७ साली तर एमजीआरनी जयललितांना पक्षातून हाकलण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र ते घडले नाही. त्यानंतर काही दिवसांनीच एमजीआर यांचे निधन झाले आणि अण्णा द्रमुकची दोन शकले झाली. त्यावेळी बहुसंख्य आमदारांनी एमजीआरची तिसरी पत्नी जानकीयम्मा यांच्या मागे उभे राहण्यात शहाणपणा मानला. पण त्यांचे सरकार केवळ २४ दिवस टिकले आणि केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांत जानकीयम्मा आणि जयललिता गटांचे विलीनीकरण होऊन पक्षावर जयाम्मांचा ताबा निर्माण झाला.

१९८८ साली राज्याच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून जयललितांची नियुक्ती झाली. याच दरम्यान करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील हाडवैराची पायाभरणी झाली. विरोधी पक्षाच्या नेत्या या नात्याने जयललितांनी करुणानिधी सरकारवर टिकेचा भडीमार केला होता. राज्यसभेपासून संसदीय कामकाजातील खाचाखोचा माहीत असल्याने त्या आयुधांचा उपयोग करून सरकारला घेरण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. द्रमुक मंत्र्यांचा प्रयत्न मात्र त्यांच्या चारित्र्यहननाकडे जास्त असे. एकदा जयललिता यांनी प्रश्न विचारल्यावर करुणानिधींनी उत्तर दिले होते – “जाऊन शोभनबाबूंना विचारा!”

२५ मार्च १९८९ रोजी मात्र या शत्रुत्वाची हद्द झाली. अर्थखाते सांभाळणारे मुख्यमंत्री करुणानिधी विधानसभेत वार्षिक अंदाजपत्रक मांडत होते. त्यावेळी जयललिता वारंवार त्यांना अडथळे आणत होत्या. करुणानिधींनी राजीनामा द्यावा, यासाठी त्या हट्टाला पेटल्या होत्या. त्यावेळी जयललिता साधी साडी नेसून यायच्या. त्यांनी आपल्या पक्षाच्या के. ए. सेंगोट्टियन या आमदाराला करुणानिधींवर निकराचा हल्ला चढवायचा आदेश दिला. हे ऐकताच द्रमुकच्या दुरैमुरुगन या मंत्र्याने सरळ त्यांच्याकडे धाव घेऊन जयललितांच्या पदराला हात घातला. यानंतर विधानसभेत मोठे रणकंदन माजले.

बुद्धिमान परंतु लहरी राजकारणी म्हटल्या जाणाऱ्या जयललिता यांना उत्तम प्रशासक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांची पहिली कारकीर्द (१९९१-१९९६) त्यांच्या अहंकारी वर्तनामुळे गाजली होती. त्यावेळी त्यांच्या भ्रष्टाचाराचे आणि अहंमन्यतेचे किस्से खूप प्रचलित होते. त्यांनी सगळ्यांशीच पंगा घेतला होता. त्यावेळी १९९६ च्या निवडणुकीच्या वेळेस सुपरस्टार रजनीकांत यांनी एक विधान केले होते, “जयललिता पुन्हा सत्तेवर आल्या, तर ईश्वरही तमिळनाडूला वाचवू शकणार नाही.” त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचा पराभव झाला.

दुसऱ्या कारकीर्दीत (२००१-२००६) त्यांचा भ्रष्टाचार कमी झाला, प्रशासन तर त्या उत्तम चालवितच. याच काळात २००४ साली आलेल्या त्सुनामीने होत्याचे नव्हते केले. मात्र अत्यंत कमी काळात अफाट कौशल्याने त्यांनी ते पुनर्वसन केले. आजवर त्या कामाबाबत एकही तक्रार नाही, हीच त्यांच्या कौशल्याची पावती होय. मात्र त्यांचा हेकेखोरपणा कायम राहिला. करुणानिधींना फरफटत नेण्याची घटना याच काळातील. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांना फटका बसला.

मात्र तिसऱ्या कारकीर्दीत (२०११-१६) त्यांनी अधिक कल्याणकारी भूमिका घेतली. अम्मा उणवगम् (स्वस्तातील उपाहारगृहे), अम्मा तन्नीर (स्वस्तातील पाण्याच्या बाटल्या), अम्मा मरुत्तुवगम् (स्वस्तातील औषधी दुकान) अशा नाना योजना त्यांनी सुरू केल्या. त्यामुळे महिला मतदारांच्या मनात त्यांनी आपसूक घर केले आणि सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला.

जयललिता यांच्या बुद्धिमत्तेचे अनेक किस्से तमिळनाडूत सांगितले जातात. त्यांना शिकविण्यासाठी एमजीआरनी काही जणांची नियुक्ती केली होती. त्यातील एक त्यांना इंग्रजी साहित्य शिकवित असे. एकदा या शिक्षकाने त्यांना शेक्सपियरची काही वाक्ये ऐकविली. तो शिक्षक जिथे थांबला, त्या वाक्यापासून पुढे संपूर्ण उतारा जयललितांनी त्याला ऐकविला होता!

जयललितांचे देवधर्म करण्याचे वेड तर जगजाहीर आहे. खासकरून यज्ञ आणि होम-हवन करण्यात त्यांना जास्त रस होता. अशा एखाद्या यज्ञात भटजीने घाईने किंवा चुकीचे मंत्र म्हटल्यास त्याला थांबवून योग्य मंत्र सांगण्याएवढी त्यांची तयारी असायची.

तरीही ‘मूळ स्वभाव जाईना’ या उक्तीनुसार आपला वरचष्मा दाखविण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, तेव्हा त्यांच्या जया टीव्ही या वाहिनीवर त्यांचा उल्लेख ‘मक्कळ मुदलवर’ म्हणजे जनतेच्या मुख्यमंत्री असाच व्हायचा!

रुपेरी पडद्यावर नाना भूमिका वठविल्या असल्या, तरी लढवय्या महिला आणि राज्यकर्ती महाराणी या वास्तव जीवनातील त्यांच्या भूमिकाच लोकांच्या मनावर ठसल्या. ब्राह्मण कुटुंबाची पार्श्वभूमी, कर्नाटकात गेलेले बालपण आणि पुरुषप्रधान वातावरण, अशा परिस्थितीतही त्यांनी एकहाती यश मिळवून दाखवले. एकदा नव्हे, अनेकदा! लोकांच्या लक्षात राहील ते त्यांचे मेकअपांकित रूप नव्हे, तर योद्ध्यासारखी दिलेली लढत आणि महाराणीचा रुबाब!
– देविदास देशपांडे