कामाची वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एअर इंडिया प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. एअर इंडियाने विमान उड्डाणाची वेळ न पाळणाऱ्या आपल्या सेवेतील १७ हवाईसुंदरींना निलंबित केले आहे.
एअर इंडियाने आतापर्यंत २७२ केबिन क्रू कर्मचाऱ्यांवर बेशिस्तीचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच उशिरा येणारे कर्मचारी यामुळे एअर इंडियाच्या विमानाची उड्डाणे विलंबाने सुरू होती. त्यानंतर व्यवस्थापनाने कारवाई सुरू केल्यानंतर ओटीपी ऑन टाइम परफॉमन्समध्ये सुधारणा झाली. आखाती देशामध्ये एअर इंडियाच्या केबिन क्रूने विश्रांतीसाठी जास्त वेळ घेतला, त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला होता.
विमानाचे संचलन करणारा केबिन क्रूचा कर्मचारी वर्ग किती वाजता विमानतळावर येतो यावर एअर इंडियाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निलंबित केलेल्या १७ हवाईसुंदरींमुळे तीनपेक्षा जास्त वेळा नियोजित उड्डाणाला विलंब झाल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.