अजमेर दर्गा स्फोट प्रकरणातील संशयित आरोपीने एक धक्कादायक दावा केला आहे. अजमेर स्फोटाप्रकरणी बुधवारी (२२ मार्चला) देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना शिक्षा सुनावण्याआधी एनआयए कोर्टाने ८ मार्चला दोषी ठरवले होते. यामध्ये सुनील जोशी (२००७ मध्ये मृत), भावेश आणि देवेंद्र यांना दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणातील आणखी एक संशयित असलेल्या भरत मोहनलाल रतेश्वरने एक धक्कादायक दावा केला आहे.

रतेश्वरने एनआयएला जबाब देताना या प्रकरणातील दोषी सुनील जोशीने सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती, अशी माहिती दिली आहे. २००७ मध्ये सुनील जोशीची हत्या झाली आहे. ‘आम्ही एका आश्रमाच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होते. रात्रीचे नऊ वाजले होते आणि तेव्हा मी सुनील जोशींसह आदित्यनाथ यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मी काही अंतरावर उभा होतो. मात्र जोशी आदित्यनाथ यांच्या जवळ बसले होते. दोघेही अतिशय कमी आवाजात एकमेकांशी बोलत होते,’ असा जबाब रतेश्वरने एनआयएला दिला आहे.

राजस्थानचे दहशतवादविरोधी पथक आणि एनआयएला तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार सुनील जोशी आणि आदित्यनाथ यांची भेट मार्च-एप्रिल २००६ मध्ये झाली होती. डिसेंबर २००७ मध्ये सुनील जोशीची हत्या झाल्यावर त्याच्याकडून एक डायरी जप्त करण्यात आली. या डायरीमध्ये योगी आदित्यनाथ यांचे फोन नंबरदेखील होते. इंडियन एक्स्प्रेसने याविषयी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

सुनील जोशीसोबत गोरखपूरसह झारखंड, आग्रा आणि नागपूरला जाण्याच्या सूचना स्वामी असीमानंद यांच्याकडून करण्यात आल्या होत्या, असे रतेश्वरने एनआयएला सांगितले आहे. रतेशवर आणि जोशी इंदूरनंतर चितरंजनला पोहोचले. याठिकाणी त्यांना भेटण्यासाठी जिल्हा आरएसएस प्रचारक देवेंद्र गुप्ता आला होता, अशी माहिती आरोपपत्रात आहे. यानंतर जोशींसह दोन दिवस जमतारामध्ये थांबल्यानंतर आग्र्याला गेल्याची माहिती रतेश्वरने दिली आहे.