पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी आणि लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार अमित शहा यांची बुधवारी भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शहा यांना पक्षाध्यक्षपदी नियुक्त करून नरेंद्र मोदी यांनी पक्षावरही वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
 भाजपचे विद्यमान अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शहा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला एकमुखाने अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर राजनाथ यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत शहा यांच्याकडे सूत्रे सोपवली. भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून अमित शहा यांच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी स्वत पंतप्रधान मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आदी नेतेमंडळी उपस्थित होती. मोदी यांनी शहा यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शहा यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. ‘तुमच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करेल’, असे सांगत शहा यांनी पत्रकारांची बोळवण केली. पक्षात दुसरे सत्ताकेंद्र तयार होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठीच मोदी यांनी शहा यांना पक्षाध्यक्ष पदावर बसवले आहे. शहा यांच्या माध्यमातून त्यांना पक्षावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. अमित शहा यांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी हरयाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. मितभाषी असलेल्या शहा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात पक्षप्रचाराची धुरा वाहिली. तेथे तब्बल ७१ खासदार निवडून आणत शहा यांनी मोदी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग अधिकच प्रशस्त केला होता. मात्र, हा करिश्मा महाराष्ट्र व हरयाणामध्ये दाखविल्यानंतरच शहा यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल.

जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारली
शहांविरोधात सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यांना पक्षाचा अध्यक्ष करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता. मात्र, खुद्द नरेंद्र मोदी यांनीच शहा यांच्या विरोधातील सर्व प्रकरणे निकाली काढण्याची जबाबदारी घेतल्याचे आश्वासन संघ नेत्यांना दिले. त्यानंतर शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.
सेनेचा भाजपशी
सुसंवाद खुंटणार?
भाजपच्या अध्यक्षपदी शहा यांची निवड झाल्याने शिवसेनेचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेला संवाद तुटेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

फोटो गॅलरी : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा 
भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी सकाळी झाली. त्यामध्येच शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपचे एक व्यक्ती-एक पद असे सूत्र असल्याने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शहा यांनी बुधवारी राजनाथ सिंह यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
उत्तर भारतात विशेषत: उत्तर प्रदेशात भाजपला निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले. त्यामध्ये शहा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागा भाजपने पटकाविल्या. त्यामागे शहा यांची रणनीती होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते मोदी सरकारमध्ये असल्याने पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.