सहकारी जवानाची गोळी झाडून हत्या केल्यानंतर लष्करातील जवानानेही डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाटणातील दानापूर येथे घडली आहे. पाटणा पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

दानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगलम वसाहतीत ही घटना घडली. लान्स नायक पदावर कार्यरत असलेल्या संतोष कुमारची (वय ३०) अरुणाचल प्रदेशमध्ये नुकतीच बदली झाली होती. त्याआधी दानापूर येथील रेजिमेंटल सेंटरमध्ये तो सेवेत होता. लष्करातील कॉन्स्टेबल रिंकेश कुमारही (वय २२) त्याच ठिकाणी कार्यरत होता. संतोष कुमारने रिंकेशला प्रशिक्षण देत होता. यामुळे दोघांची चांगली मैत्रीही झाली होती. पण संतोषची बदली झाली. पण त्याचे कुटुंब दानापूरमध्येच राहते. तो सुट्टीत पाटणात येत असे. त्यावेळी तो रिंकेशचीही भेट घ्यायचा.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोषने दानापूरमध्ये आल्यानंतर रिंकेशला रविवारी रात्री जेवणासाठी बोलावले. त्याची पत्नी आणि मुलगा मूळगावी छप्रा येथे गेले होते. रिंकेश त्याच्या घरीही आला. आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्यासाठी संतोष त्याच्यावर दबाव टाकत होता. याचवरून त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्याचे पर्यावसन हत्येत झाले असावे, अशी शक्यता आहे. दानापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले, की ”रिंकेशवर रायफलमधून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर संतोषने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून तीन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. रिंकेशचा मृतदेह घरातील बाथरुमजवळ होता. तसेच रक्ताने माखलेली बेडशीटही तेथे सापडली.”

रिंकेशची बहिण दानापूरमध्येच राहते. रविवारी संध्याकाळपर्यंत रिंकेश दानापूरमधील त्याच्या बराकमध्ये परतलाच नाही, असे तिला समजले. तिने सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सगळीकडे चौकशी केल्यानंतर तिने संतोषचे घर गाठले. ते बंद होते. पण घराच्या मालकाने तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा संतोषच्या घरी गेली. त्यावेळी घरात दोघेही मृतावस्थेत सापडले, अशी माहिती पोलीस अधिकारी राजेश कुमार यांनी दिली.

संतोषची चुलत बहिण आहे. रिंकेशचे तिच्याशी लग्न व्हावे, अशी संतोषची इच्छा होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे फोटो एकमेकांना दाखवले होते. दोघांचीही ओळख झाली होती. ते एकमेकांशी फोनवरून गप्पाही मारत असत. पण अचानक रिंकेशच्या पालकांनी लग्नास नकार दिला आणि त्याच्यासाठी दुसऱ्या मुलींचा शोध सुरू केला. याचाच राग संतोषच्या मनात होता, अशी माहिती रिंकेशची बहिण पिंकीने पोलिसांना दिली.