काश्‍मीरसंदर्भातील वादग्रस्त कलम३७० विषयीचा मुद्दा केवळ भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वैयक्तिक अजेंड्याचा भाग असून त्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात कलम ३७०, अयोध्येतील राम मंदिर आणि समान नागरी कायदा यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असल्यामुळे विरोधकांनी त्यावर टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गडकरी यांनी स्षष्टीकरण देताना “कलम ३७० हा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात आहे. केंद्रामध्ये स्वबळावर संपूर्ण सत्ता मिळाल्यास भाजप त्याविषयी निर्णय घेईल.” असे सांगितले. भाजपच्या जाहीरनाम्यातील अशा घोषणांमुळे त्यांची साथ सोडण्याचा निर्णय योग्यच होता, असे सिद्ध होत आहे’ अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टीका केली.