आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाला मिळणारा निधी हवाला व्यवसायाशी संबंधित कंपन्यांकडून येत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख अरविंद ‘हवाला’ केजरीवाल असा केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर शरसंधान साधले आहे.

आम आदमी पक्षाला हवाला व्यवसायाशी संबंधित कंपन्यांकडून निधी मिळत असल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे. ‘अरविंद केजरीवाल यांचे नाव अरविंद ‘हवाला’ केजरीवाल असे का ठेवले जाऊ नये ?’ असा सवाल कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीचे माजी जलमंत्री असलेल्या मिश्रा यांनी रशिया दौऱ्याबद्दलची माहिती असल्याचा दावा केला आहे. दौऱ्यातील कागदपत्रे हवाला व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे.

अरविंद केजरीवालांनी परदेश दौऱ्यांची सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी कपिल मिश्रा यांनी पुन्हा केली. केजरीवालांनी परदेश दौऱ्यांची माहिती सार्वजनिक केली नाही, तर आपण एका एका दौऱ्याची माहिती सार्वजनिक करु, असा इशारा कपिल मिश्रा यांनी दिला आहे. ‘कोण कोण जर्मनीला गेले होते, किती दिवसांसाठी गेले होते आणि तिथे कोणाकोणाची भेट घेतली ?’ असे प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केले आहेत. या सगळ्या दौऱ्यांची माहिती आपल्याकडे असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

कपिल मिश्रा यांना आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्लीतील पाणीपुरवठ्याची समस्या सोडवू न शकल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. मात्र पक्षातील महत्त्वाचे नेते कुमार विश्वास आणि कपिल मिश्रा बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती केजरीवाल यांना समजल्यानेच मिश्रा यांचे निलंबन करण्यात असल्याचे बोलले जाते.