दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यास २४ सप्टेंबरपासून सुरूवात करणार आहेत. घशावरील शस्त्रक्रियेनंतर ते पंजाबचा दुसरा दौरा करतील. आपल्या दुसऱ्या टप्प्यात ते लुधियानामध्ये ३ ऑक्टोबरपर्यंत राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केजरीवाल यांनी ४ दिवसांच्या आपल्या पंजाब दौऱ्याची रविवारी सांगता केली. रविवारी त्यांनी मोगा येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ‘किसान घोषणापत्र’ जाहीर केले होते. आता ते बेंगळूरू येथे शस्त्रक्रियेसाठी जाणार आहेत.
२४ सप्टेंबरपासून केजरीवाल आपला पंजाब दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू करतील. या १० दिवसांत ते लुधियाना राहतील, अशी माहिती संगरूरचे खासदार भगवंत मान यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. लुधियानाजवळील विविध मतदारसंघात ते जातील. आपल्या पुढील दौऱ्यात ते ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रित करतील. पहिल्या दौऱ्यात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
खासदार मान म्हणाले, सर्व ११७ विधानसभा मतदारसंघात जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. केजरीवाल स्वत: प्रत्येक मतदारसंघात फिरणार आहेत. पहिले चार दिवस हे कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे होते. आता दुसऱ्या टप्प्यात नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत. लुधियाना हे पंजाबच्या मध्यस्थानी आहे. त्यामुळे लुधियानात तळ ठोकणे केजरीवाल यांना सोपे जाणार आहे.
पंजाब दौऱ्यामुळे केजरीवाल यांचे दिल्लीकडे दुर्लक्ष होणार नाही. दिल्लीतील बहुतांश कामे ही फोन आणि इंटरनेटवरूनच होतात. केजरीवाल यांना पंजाबची चिंता आहे. याचा दिल्लीतील  कामावर परिणाम होणार नाही, असेही मान यांनी या वेळी स्पष्ट केले.