दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्यंगचित्र शेअर करून गुजरातमधील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी हे व्यंगचित्र पोस्ट केले. यामध्ये गुजरात मॉडेलची खिल्ली उडविण्यात आली आहे. व्यंगचित्रामध्ये गाय लोकांना पायदळी तुडवत चालत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्याचवेळी व्यंगचित्रातील आजूबाजूचे लोक ‘COW WALK’ असे ओरडत असल्याचे पाहायला मिळते. व्यंगचित्राच्या माध्यमातून केजरीवाल यांनी गुजरातमध्ये झालेल्या दलितांवरील हल्ल्याला वाचा फोडली. मेलेल्या गायीचे चामडे काढण्याच्या आरोपावरून एका दलित कुटुंबाला मारहाण करण्याची घटना नुकतीच गुजरातमध्ये घडली होती. यानंतर संपूर्ण राज्यात या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली. अनेकांनी तर आत्महत्यादेखील करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले.

गुजरातमधील त्या दलित कुटुंबाची भेट घेण्यासाठी केजरीवाल शुक्रवारी गुजरातमध्ये गेले होते. त्या कुटुंबाची चौकशी करत त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. गुजरातमधील भाजप सरकार हे दलित विरोधी सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलीस अद्याप कारवाई का करत नाहीत, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. यावरून गुजरात सरकारचा या प्रकरणात समावेश असल्याचे निदर्शनास पडत असल्याचे ते म्हणाले. गुजरातमधील हे दलित विरोधी सरकार दलितांना दबावात ठेवत असून, अशा प्रकारच्या घटना थांबायला हव्यात, अशी भावना व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केजरीवालांनी पोस्ट केलेले व्यंगचित्र आणि त्यावरील प्रतिक्रिया –

केजरीवाल यांनी हे व्यंगचित्र रिटि्वट केले होते.