अरुणाचल प्रदेशमधील चॅंगलॅंग येथे झालेल्या चकमकीत आसाम रायफलचे दोन जवान शहीद झाले. आज सकाळी एनएससीएन-के या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. अरुणाचल प्रदेशमधील जयरामपूर येथे ही चकमक झाली.

आसाम आणि अरुणाचलच्या सीमेवर हा भाग आहे. भारतीय जवानांचे वाहन पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला हॅंडग्रेनेड ने झाला. त्याच्या प्रत्युत्तरात आसाम रायफलनेदेखील गोळीबार सुरू केला असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.

जेव्हा सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती तेव्हा पांगसौ पासवर अनेक गाड्यांची नाकाबंदी करुन ठेवण्यात आली होती. पांगसौ पास ही भारत – म्यानमार सीमा आहे. अनेक स्थानिक वाहने तसेच परदेशी पर्यटकांनी भरलेल्या वाहनांना काही काळ प्रवास करण्यास मज्जाव होता.

ईशान्य भारतात गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांमधील हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. चार डिसेंबरला आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले होते. १९ नोव्हेंबर रोजी उल्फा आणि एनएससीएन-के या दोन दहशतवादी संघटनांनी मिळून लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन जवान शहीद आणि चार जण जखमी झाले होते. २६ नोव्हेंबरला पॅरा कमांडोंसोबत दहशतवाद्यांची चकमक झाली होती. यावेळी पाच सैनिक जखमी झाले होते. या दहशतवाद्यांचे तळ म्यानमारमध्ये आहेत.