देशात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच त्यांच्या मंत्र्यांना वादग्रस्त विधाने करण्यास सांगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत सोनिया गांधी यांनी मोदींवर हल्ला चढविला.
विशेष म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीदेखील मोदींवर उपरोधिक टीका केली. माझे उत्तराधिकारी माझ्यापेक्षा जास्त बोलके व उत्तम विक्रेते असल्याचा टोमणा मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला. जमीन अधिग्रहणावरील अध्यादेशानंतर काँग्रेस पक्ष अत्यंत आक्रमक झाला आहे.
सोनिया म्हणाल्या की, एकीकडे विकास करीत असल्याचे भासवायचे व दुसरीकडे मंत्र्यांना धर्माध वक्तव्ये करण्याची मुभा द्यायची, असा दुहेरी खेळ मोदी खेळत आहेत. कल्याणकारी राज्यांची संकल्पना मोडीत काढून मोदींना स्वत:च्या हातात सत्ता एकवटायची आहे; परंतु आम्ही असे होऊ देणार नाही. जाणीवपूर्वक देशात जातीयवाद आणि भीतीचे वातावरण पसरवले जात असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. मोदींची कार्यशैली अत्यंत चिंताजनक बाब आहे. आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण, एससी व एसटी समुदायासाठी असलेल्या योजनांच्या निधीत कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सोनिया यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.