अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल यांचे उत्पन्न २०१५ मध्ये ४ लाख डॉलर्स होते व त्यांनी ८० हजार डॉलर्स इतका प्राप्तिकर भरला, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अध्यक्ष व त्यांच्या पत्नीने प्राप्तिकर विवरण पत्र भरले असून त्यानुसार त्यांची प्राप्ती  ४३६०६५ अमेरिका डॉलर्स होती. त्यांनी ८१४७२ अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरला आहे. अध्यक्ष ओबामा यांचा प्राप्तिकराचा दर १८.५ टक्के होता, असे व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी प्रमुख जोश अर्नेस्ट यांनी सांगितले. ओबामा यांनी ६४०६६ डॉलर्स म्हणजे प्राप्तीच्या १४.७ टक्के रक्कम ३४ धर्मादाय संस्थांना दिली आहे. फिशर हाऊस फाउंडेशनला त्यांनी ९०६६ डॉलर्स दिले आहेत. अर्नेस्ट यांच्या मते अध्यक्षांना त्यांच्या स्वत:च्याच धोरणामुळे करभरणा करताना जास्त उत्पन्नधारकांसाठी असलेले कर अग्रक्रमांचे नियम पाळावे लागले आहेत. त्यानुसार वेतनातूनच प्राप्तिकर कापण्यात आला. श्रीमंत अमेरिकी लोकांनी देशउभारणीत हातभार लावावा यासाठी त्यांनी वेतनातूनच कर कापण्याची तरतूद श्रीमंतांसाठी करण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. कोटय़धीश व अब्जाधीश यांनी मध्यमवर्ग व नोकरदार वर्गाप्रमाणेच देशाच्या उभारणीत हातभार लावावा पण त्यासाठी कर कायद्यातील पळवाटा बंद कराव्या लागणार आहेत, असे अर्नेस्ट यांनी सांगितले. वेतनाचा धनादेश देतानाच मुलांची काळजी, महाविद्यालयीन शिक्षण व निवृत्तीकाळात सुरक्षितता यांची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी ओबामा यांनी अर्थसंकल्पात तशा तरतुदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. इलिनॉइस येथील कर विवरणपत्रही त्यांनी जाहीर केले आहे. त्यात त्यांनी १६०१७ अमेरिकी डॉलर्स इतका कर भरला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिदेन यांनी प्राप्तिकर विवरणपत्र जाहीर केले असून डेलावर व व्हर्जिनिया अशा दोन ठिकाणी त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे सादर केले. जिल बिदेन यांनी अनिवासी अमेरिकी प्रवर्गात व्हर्जिनियात कर विवरणपत्र सादर केले. त्यांचे एकूण उत्पन्न ३९२२३३ डॉलर्स असून बिदेन यांनी २०१५ मध्ये  ९१५४६ डॉलर्स इतका कर भरला आहे. त्यांच्यासाठी कराचा दर २३.३ टक्के राहिला आहे. जो बिदेन यांनी डेलावर येथे १३७२९ डॉलर्स तर जिल बिदेन यांनी व्हर्जिनियात ३८८२ डॉलर्स इतका कर भरला आहे. बिदेन यांनी २०१५ मध्ये ६६२० डॉलर्स धर्मादाय संस्थेला दिले आहेत.