हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला जम्मू-काश्मीर पालिसांनी येथून ताब्यात घेतले आहे. इश्तियाक वानी असे त्याचे नाव असून बऱ्याच काळापासून पोलीस त्याच्या मागावर होते.


वर्षभरापूर्वी बुरहान वानी या हिजबुलच्या प्रमुखाचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केल्यानंतर ही संघटना चर्चेत आली होती. त्यानंतर गेल्या काही काळात हिजबुलच्या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा रक्षकांनी मोहिम चालवली होती. आता इश्तियाक वानी याला पोलिसांना ताब्यात घेतल्याने हिजबुलचा कणा मोडल्याचे सांगण्यात येत आहे.

इश्तियाक हा हिजबुलचा खालच्या स्तरावरचा सदस्य असून प्रक्षोभक भाषणे करून काश्मीरी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल मुजाहिद्दीनचे सदस्य करून घेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. एका अर्थाने तो ही दहशतवादी संघटना मजबूत करण्याचेच काम करीत होता. जम्मू-काश्मीरमधीर अनेक दहशतवादी कारयांमध्ये तो पोलिसांना हवा होता.

दोनच दिवसांपूर्वी रविवारी काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळवले. या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. रात्री एका घराजवळ लपून बसलेले दहशतवादी आणि भारतीय सैन्य आमनेसामने आले. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार मारला गेला होता.