स्पेनमधील बार्सिलोना शहर गुरूवारी संध्याकाळी दहशतवादी हल्ल्याने हादरले. बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये एका व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले. या हल्ल्यात १३ लोक ठार झाल्याच्या वृत्ताला स्पेनच्या विभागीय मंत्र्यांनी दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात शेकडो जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. बार्सिलोना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दहशतवादी संघटना ‘आयसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात ४ संशयित दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांनी कॅम्ब्रिल्समध्ये दुसरा हल्ला केल्याचे वृत्त आहे. यामध्ये सहा नागरिक आणि एक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

 

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांची वाहने आणि रूग्णवाहिका मोठ्याप्रमाणात आहेत. एका स्थानिक पत्रकाराने बंदुकीचा आवाजही ऐकला. व्हॅनमधील हल्लेखोरांनी पायी जात असलेल्या लोकांना चिरडल्याचे सांगितले जाते. वर्दळीच्या ठिकाणी भरधाव व्हॅन जमावात घुसल्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. हल्ल्याची माहिती मिळताच बार्सिलोनामधील मेट्रो स्थानके बंद करण्यात आले. व्हॅनमधील दोन हल्लेखोर हत्यारे घेऊन एका रेस्तराँमध्ये घुसल्याचे ‘रायॅटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून स्पेनमधील भारतीय दुतावासाशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. मृतांमध्ये भारतीयांचा समावेश नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बार्सिलोना हल्ल्याच्या माहितीसाठी या +३४-६०८७६९३३५आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडले. ही घटना ‘भयावह’ असल्याचे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत.