अर्णब गोस्वामी आणि बरखा दत्ता या दोन पत्रकारांमधील वाद मिटण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. ‘एनडीटीवी’ पत्रकार बरखा दत्त यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब आपल्या कार्यक्रमादरम्यान चुकीची माहिती सादर करतात, असा आरोप बरखा यांनी यावेळी केला. ‘एनडीटीवी’च्या वेबसाइटवर बरखा यांनी लिहलेल्या लेखातून अर्णब तुम्ही मोदींना घाबरता का? असा सवालही करण्यात आला आहे. दरम्यान, अर्णब यांनी आपल्या चर्चासत्रातील कार्यक्रमातून बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या वृत्तांकनाला लष्कराविरुद्धचे बंड असल्याचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे बरखा यांनी म्हटले आहे. अर्णब यांच्या अशा कृत्याला आम्ही घाबरत नसल्याचेही त्या म्हणाल्या. यापूर्वी बुधवारी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून बरखा यांनी अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य केले होते. ‘टाइम्स नाऊ’कडून प्रसारमाध्यमांचा आवाज बंद करण्याची, पत्रकारांवर खटले चालविण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याचा मुद्दा चर्चेला आणण्यात आला. ही मागणी करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना पत्रकार म्हणायचे का? त्यांच्या या मागणीमुळे मला मी पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याची लाज वाटते. असे बरखा दत्त यांनी म्हटले होते. एकीकडे ते चर्चांमध्ये सतत पाकिस्तानची बाजू घेणारी वक्तव्ये करतात. मात्र, त्याचवेळी ते काही गोष्टींवर भाष्य करणे टाळतात. जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी युतीविषयी ते का बोलत नाहीत? भाजप-पीडीपी युतीच्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी पाकिस्तान आणि हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मोदींच्या पाकिस्तानविषयीच्या भूमिकेबद्दल ते का बोलत नाहीत, असा थेट सवाल बरखा दत्त यांनी उपस्थित केला होता.