गेले दोन दिवस बेपत्ता असलेल्या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका इसमाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूर्व मिदनापूर जिल्ह्य़ातील कालीबाझार गावाजवळील एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळला. आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांकडे दाखल केली होती. त्याचबरोबर त्यांनी याप्रकरणी तीन इसमांविरोधात संशय व्यक्त केला होता. त्या तिघांपैकी एकास गावकऱ्यांनी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ही मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तसेच गावातील इतरजणांनी आसपासच्या परिसरात तिचा शोध घेऊनही तपास लागला नव्हता. गुरुवारी सकाळी या मुलीच्या घराजवळच तिचा मृतदेह आढळला. मात्र तिचा मृतदेह झाडावर लटकवलेल्या अवस्थेत होता आणि आपणच तो उतरविल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. याप्रकरणी रतन दास हा इसम सदर मुलीच्या घराजवळच राहात होता. त्याने आणि इतर दोघांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या संशयावरून दासच्या घराची नासधूस केली, तसेच या तिघांना मारहाण केली. त्यापैकी दास रुग्णालयात मरण पावला तर अन्य दोघांना पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून सोडविले.
रतन दास हा अत्यंत सराईत गुंड होता आणि महिलांची सातत्याने छेडछाड करीत असे. वारंवार समजावूनही त्याच्या वर्तनात फरक पडला नसल्याची गावकऱ्यांची तक्रार होती.