बिहारमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. पुराचं पाणी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागलं आहे. याच महापुरामुळे अररिया बहादुरगंज रस्त्यावरील पूल कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले आहेत. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. १३ ऑगस्टची घटना स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. या महापुरामुळे बिहारमध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ९० लाखांहून अधिक लोक पूरग्रस्त झाले आहेत. या पुरात अररिया जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसंच सीतामढी, माधेपुरा, पूर्व चंपारण, दरभंगा आणि मधुबनी या ठिकाणीही पुरामुळे लोकांचे मृत्यू झाले.

बिहारमध्ये उद्भवलेल्या या आस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्राकडे मदत मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारला पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलंय. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबतही नितीशकुमार यांनी फोनवरून चर्चा केली असून  बिहारसाठी केंद्रानं जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.