लोकसभेतील कामकाजाचे चित्रीकरण केल्याप्रकरणी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. गोरक्षकांचा धुडगूस आणि जमावाकडून होत असलेल्या हत्येच्या प्रकरणांवरून सभागृहात सुरू असलेल्या गोंधळाचे अनुराग ठाकूर हे व्हिडिओ शुटिंग करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोकसभेच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे नियमबाह्य असल्याची तक्रार काँग्रेसचे के.सी.वेणुगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

वेणूगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे, अनुराग ठाकूर यांच्यावर त्वरीत कारवाई करावी. भाजप आपल्या प्रचंड बहुमताच्या जोरावर आमचा आवाज दाबू शकत नाही. सर्वसामान्यांच्या मुद्दयावर आवाज उठवण्यापासून ते आम्हाला रोखू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले.

भाजपकडून वारंवार आम्हाला नियमांची जाणीव करून दिली जाते. परंतु, विरोधी पक्षाच्या आवाजाशिवाय खरी लोकशाही नांदू शकत नाही, असे काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी म्हटले.

आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्या प्रकरणाचा मुद्दा काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित केला. माकन यांनी संसद व संसदेबाहेरील परिसराचे चित्रिकरण केले होते. याप्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याचपद्धतीने सदनाच्या नियमांचे उल्लंघन आणि सदनाची सुरक्षितता धोक्यात घातल्याच्या आरोपाखाली ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.