पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना लोकप्रिय करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने चार महिने ‘पंच क्रांती’ कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्याची सुरुवात पुढील महिन्यापासून करण्यात येणार आहे.
निर्माण क्रांती (मेक इन इंडिया), कौशल क्रांती (स्किल इंडिया), स्वच्छ भारत क्रांती (क्लीन इंडिया), कन्या शक्ती क्रांती (बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान) आणि योग क्रांती (योगा) आदी कार्यक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
देशातील १० दशलक्ष जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत ऐतिहासिक भाषण केले त्या दिवसाचे औचित्य साधून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार असून तो १२ जानेवारी २०१६ पर्यंत सुरू राहणार आहे, असे भाजयुमोचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
याबरोबरच पंतप्रधान विमा योजना आणि अपघात व आरोग्य विमा योजनेबाबतही जनजागृती करण्याची गरज आहे, असे या वेळी भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनी सांगितले. भाजयुमोचे एका दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते तेव्हा ही माहिती देण्यात आली.