स्वित्र्झलडच्या बँकांत दडवलेला काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारी यंत्रणांची धावाधाव सुरू असतानाच हा पैसा सोन्याच्या रूपात भारतात येऊ लागल्याचा धक्कादायक संशय व्यक्त होत आहे. भारतात काळय़ा पैशाविरोधात कडक मोहीम सुरू होताच जानेवारी २०१४पासून स्वित्र्झलडमधून तब्बल ११ अब्ज स्विस फ्रँक (७० हजार कोटी रुपये) किमतीचे सोने भारतात आयात झाल्याचे उघड झाले असून, यातील बहुतांश सोने काळय़ा पैशाचे ‘सफेदीकरण’ करण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे.
भारतातून परदेशात नेण्यात आलेला बहुतांश काळा पैसा स्वित्र्झलडमधील बँकांत दडवल्याची ओरड फार आधीपासून होते आहे. त्यामुळे गोत्यात सापडलेल्या स्विस बँकांनी आता भारतीय खातेदारांकडून हमीपत्रच लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. या हमीपत्रांच्या आधारे काळय़ा पैशाविरोधातील कारवाईतून स्वत:ची सुटका करून घेण्याचे या बँकांचे मनसुबे आहेत. तर जे खातेदार हमी लिहून देऊ इच्छित नाहीत, त्यांना हा काळा पैसा सोने किंवा अन्य मार्गाने हलवण्याचे सल्ले देत असल्याचे सांगण्यात येते.
स्वित्र्झलड सरकारच्याच आकडेवारीनुसार, जानेवारीपासून सप्टेंबपर्यंत सुमारे ७० हजार कोटी रुपयांचे सोने भारतात निर्यात करण्यात आले आहे. त्यापैकी एकटय़ा सप्टेंबर महिन्यातच २.२ अब्ज स्विस फ्रँक्स (१५ हजार कोटी रुपये) किमतीच्या सोन्याची निर्यात करण्यात आली. सप्टेंबरमध्ये भारतात सोन्याची आयात वाढण्याचे कारण सणासुदीची मागणी असल्याचे सांगितले जात असले तरी या परिस्थितीचा फायदा घेऊन काळा पैसा सोन्याच्या रूपात भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शक्यता आहे.
*स्वित्र्झलड सरकारच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १७२.५ टन सोन्यासह ३४७ टन वजनाची चांदी आणि नाणी निर्यात करण्यात आली.
*यामध्ये भारताचा वाटा जवळपास ६६.५ टन इतका होता. त्यातही ५८ टन सोन्याचा समावेश आहे.
*तर ऑगस्टमध्येही ८०.६ टन सोन्यापैकी २९.५ टन सोने भारतात निर्यात करण्यात आले.
असे होते ‘काळय़ाचे सोने’
*काळा किंवा बेकायदा पैसा आर्थिक व्यवस्थेत खेळवण्यासाठी त्याला सोन्याचा ‘मुलामा’ दिला जातो.
*पहिल्या टप्प्यात काळात पैसा तिजोऱ्यांत किंवा बनावट आर्थिक व्यवहारांनी व्यवस्थेत दाखवला जातो.
*त्यानंतर तो बाजारात खेळवण्यापूर्वी त्या मूल्याची सोने, चांदी किंवा हिरे खरेदी करून ते अपेक्षित ठिकाणी पोहोचवले जाते.