गंगा नदीच्या पात्रात जवळपास ३० मृतदेहांचे अवशेष तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. उनाव जिल्ह्याच्या परियार घाटातील गंगेच्या पात्रात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हे मृतदेह वर आले आणि गावकऱयांच्या नजरेस पडले. यावर संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
गंगेच्या पात्राजवळच स्मशानभूमी आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कारावेळी कुटुंबिय तेथून निघून गेल्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेतच मृतदेह गंगा नदीत टाकण्यात येतात. अविवाहित मुलींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करता ते मुक्तपणे गंगा नदीत सोडण्यात येतात, अशी माहिती गावकऱयांशी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलीस अधिकारी सतिश गणेश यांनी दिली आहे. आढळून आलेले सर्व मृतदेह पूर्णपणे विद्रुप अवस्थेत असल्यामुळे त्यांची ओळख पटणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आढळून आलेले मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे सफाई कामगारांनीही ते उचलण्यास इन्कार केल्याची माहिती समोर आली आहे. तर, उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.