लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमेठी मतदारसंघात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला रद्द करावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केली आहे.
केजरीवाल यांनी लखनऊ पीठापुढे शुक्रवारी ही याचिका दाखल केली असून त्यावर न्या. महेंद्र दयाळ यांच्यासमोर ३ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अमेठीतील मुसाफिरखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर २० जुलै रोजी जामीनपात्र वॉरण्ट बजाविण्यात आले असून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या याचिकेला आव्हान देताना केजरीवाल यांनी खटला रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी २० मे २०१४ रोजी केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे राज्य सरकारचे वकील रिशाद मुर्तझा यांनी सांगितले.