खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता केंद्र सरकारने महात्मा गांधीचे छायाचित्र वापरताना दक्षता घेण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. गांधींचे छायाचित्र, स्केच किंवा त्यांच्याशी संबंधित चरखा, चश्मा यासारख्या कोणत्याही वस्तूंचा अस्वच्छ ठिकाणी वापर करु नका असे सरकारने म्हटले आहे.

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने राज्यांमधील स्वच्छता अधिका-यांना निर्देश दिले आहेत. सध्या देशभरात स्वच्छ भारत मोहीम राबवली जात आहे. पण ही मोहीम राबवताना कोणाच्याही भावना दुखावू नका असे सरकारने म्हटले आहे. अस्वच्छ ठिकाणी उदाहरणार्थ सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या भिंतीवर गांधींचे छायाचित्र वापरु नका असे निर्देशमध्ये म्हटले आहे. राज्यातील स्वच्छता प्रमुखांनी जिल्हा पातळीवरील अधिका-यांपर्यंत या आदेशाची प्रत पोहोचवावी असे त्यांनी म्हटले आहे.

छत्तीसगडमधील हायकोर्टामध्ये बदरुद्दीन कुरेशी या व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये अस्वच्छ ठिकाणी महात्मा गांधी यांचे छायाचित्र लावण्यास विरोध दर्शवला होता. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या भिंतीवर गांधींचे छायाचित्र लावणे म्हणजे त्यांचा अपमान असल्याचे आम्हाला वाटत नाही असे नमूद करत हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. मात्र केंद्र सरकारने महात्मा गांधींचे छायाचित्र वापरताना त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश हायकोर्टाने दिले होते.

खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवर महात्मा गांधींचे चरख्यावर सूत कातत असलेले छायाचित्र हटवून त्या जागी मोदींचे छायाचित्र झळकले होते. यावरुन विरोधकांनी टीका केली होती. तर छायाचित्र छापताना परवानगी घेण्यात आली नव्हती असा दावा पंतप्रधान कार्यालयाने केला होता. याप्रकरणी कार्यालयाने संबंधीत मंत्रालयाकडून खुलासाही मागवला आहे.