उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापले  असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली आहे. पाकिस्तानी कलाकारांना धमकावून पळवून लावण्यापेक्षा दहशतवाद्यांना पळवून लावायला हवे, असे वक्तव्य करीत आठवलेंनी पाकिस्तानी कलाकारांना पळवून लावण्याची मनसेची भूमिका अयोग्य असल्याचे सूचित केले. रोहतकमधील पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवलेंनी पाकिस्तान कलाकारांविषयी मनसेने दिलेल्या धमकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. देशातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कलाकारांवर अन्याय करण्यापेक्षा दहशतवाद्यांना पळवून लावा , असा सल्ला आठवले यांनी मनसेला नावाचा उल्लेख न करता दिला.  जम्मू काश्मीरमधील उरीतील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

यापूर्वी पाकिस्तानी कलाकारांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे वादग्रस्त आमदार अबु आझमी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हानल दिले होते. पाकिस्तानी कलाकारांना नाहक धमकावण्यापेक्षा हिंमत असेल तर आत्मघातकी पथके बनवून लाहोर आणि कराचीला पाठवा, असे अबु आझमी यांनी म्हटले होते.  जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली असताना मनसेने पाकिस्तानी कलाकारांना धमकावले होते. पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत देश सोडावा अन्यथा त्यांना पळवून लावण्यात येईल अशी धमकी मनसेने शुक्रवारी दिली होती.