काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी सरकार युपीए सरकारच्या कार्यकाळातील योजनांचे अनुकरण करत असल्याचा आरोप यावेळी सोनियांनी केला. दिल्लीत सुरू असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षातील सदस्यांना भाजपच्या फुटीरतावादी आणि हुकूमशाहीच्या राजकारणाचा प्रतिकार करण्याचे आदेश दिले. जातीय दंगलींच्या मुद्द्यावरून सोनिया गांधीनी पुन्हा एकदा मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. तसेच सध्याच्या सरकारच्या हुकूमशाहीच्या राजवटीविरूद्ध काँग्रेस लढा देणार असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षासाठी सध्याचा काळ कसोटीचा असून लोकसभेत  काँग्रेस पक्षाला प्रथमच इतक्या कमी जागा मिळाल्या आहेत. परंतु, आता काँग्रेस पक्षाच्या पुर्नबांधणीची आणि सदस्यांमध्ये पुन्हा विश्वास जागृत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सोनिया गांधींनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी पूर्ण क्षमतेनिशी संघर्ष करण्याची शपथ सोनिया गांधींनी यावेळी घेतली.