छत्तीसगडमध्ये अंतागड विधानसभेच्या मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रसचे आमदार अमित जोगी यांना बुधवारी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्यानंतर आज अमित जोगी छत्तीसगढच्या काँग्रेस समितीसमोर हजर झाले होते. त्यावेळी या समितीकडून अमित जोगी यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी बोलताना छत्तीसगढ काँग्रेसचे अध्यक्ष भुपेश बघेल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने कारवाई केली आहे, आता अंतागडमध्ये लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची वेळ भाजपची आहे.
छत्तीसगडमध्ये अंतागड विधानसभेच्या मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने पैसे घेऊन उमेदवारी मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने उघडकीस आणला होता. अंतागडच्या जागेसाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचा जावई पुनित गुप्ता आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणाची टेप ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या बुधवारी प्रसिद्ध केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले होते. या टेपमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी अमित जोगी, पुनीत गुप्ता आणि उमेदवार मंतुराम पवार यांच्यात पैशांची देवाण-घेवाणीची चर्चा सुरू असल्याचे निदर्शनास येते. या प्रकरणामुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांनी अमित जोगी यांना स्पष्टीकरण देण्याबाबत नोटीस बजावली होती. तसेच मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या राजीनाम्याचीही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र, अजित जोगी आणि उमेदवारी मागे घेतलेले मंतूराम पवार यांनी टेपमधील आवाज त्यांचा नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले होते.