गेल्या सप्टेंबरपासून भारतात आर्थिक मंदी असल्याचे ‘एसबीआय’ने अहवालात नमूद केले असतानाच आता मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने असल्याची कबुली दिली आहे. ही आव्हाने मोडून काढण्यासाठी अनेक आघाड्यांवर जोर देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारने सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ते बोलत होते.

 

सुब्रमण्यम यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाची मुदत १६ ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. मात्र, सरकारने त्यांना एका वर्षाचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. आपण अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे ते म्हणाले. आपल्यासमोर पुढील काळात अनेक आव्हाने आहेत. विकासाची गती मंदावल्याचे आपण पाहत आहोत. गुंतवणूकही सुस्तावली आहे. सरकार यावर काम करत आहे. अनेक आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. जगातील सर्वच देशांसमोर आव्हाने आहेत. अनेक देश त्यावर उपाय शोधत आहेत, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली. सुब्रमण्यम आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पुढील वर्षापर्यंत काम करत राहतील, असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. सुब्रमण्यम यांची १६ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली होती. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या कार्यकाळाची मुदत संपत आहे. मात्र, अर्थ मंत्रालयाने त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला आहे. त्यामुळे सुब्रमण्यम राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.