भारत, नेपाळ आणि भूतानच्या सीमांशी संपर्क प्रस्थापित करता यावा यासाठी सन २०२० पर्यंत तिबेटमध्ये आणखी महामार्ग, रेल्वेमार्ग तसेच विमानतळेही उभारण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. तिबेटमधील प्रवास अधिक सुलभ व्हावा, हाही त्यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले.
या योजनेअंतर्गत, एक लाख १० हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग आणि १,३०० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचा अंतर्भाव आहे, असे चीनच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले. तिबेटमध्ये सध्या सहा विमानतळ असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. तिबेटच्या ल्हासा या राजधानीपासून झिगझेपर्यंत जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या चाचण्या सध्या जोरात सुरू आहेत. हा संपूर्ण भाग भारताच्या सिक्कीम तसेच नेपाळ आणि भूतानच्या सीमांना अगदी जवळचा आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर सदर रेल्वेमार्ग पुढील महिन्यात कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे उभारणे हा चीनचा धोरणात्मक निर्धार आहे. तिबेटच्या बाहेरील प्रत्येक भागाला जोडणारा किमान एक तरी रस्ता सन २०२० पर्यंत तिबेटमध्ये उभारण्याचे चीनचे लक्ष्य आहे.