अमेरिकेमधील सिनसिनाटी येथे नाइटक्लब बाहेर झालेल्या गोळीबारात १ ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. ओहियोमधील सिनसिनाटी येथे एका नाइटक्लब बाहेर एका शस्त्रास्त्रधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. रविवारी पहाटेच्या वेळी हा हल्ला झाला असे सिनसिनाटी पोलिसांनी सांगितले. या ठिकाणी खूप गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत असे सिनसिनाटीचे पोलीस अधिकारी पॉल नुडिगेट यांनी म्हटले आहे. सध्या घटनास्थळी आमचे अधिकारी पोहचले असून आम्ही ते पुढील तपास करत आहेत असे त्यांनी म्हटले. या घटनेनंतर पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नाही. अद्यापही बंदुकधारी व्यक्ती कोण आहे याचा शोध लागलेला नाही असे पोलिसांनी म्हटले.

ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी शंभरहून अधिक लोक नाइटक्लबमध्ये होते. घटनेनंतर अनेक जण त्या ठिकाणाहून निघून गेले. त्याच बरोबर काही प्रत्यक्षदर्शी देखील निघून गेले आहेत. जे काही प्रत्यक्षदर्शी आम्हाला बोलण्यास तयार आहेत त्यांच्या मुलाखती आमच्या अधिकाऱ्यांकडून घेतल्या जात आहे असे पोलिसांनी म्हटले. या घटनेमुळे जून २०१६ मध्ये झालेल्या गोळीबाराच्या आठवणी जागा झाल्या आहेत. २०१६ मध्ये ओरलांडो येथील एका नाइटक्लब मध्ये ओमर मतीन या २९ वर्षीय तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेमध्ये ४९ जण ठार झाले होते.

कन्सास फेब्रुवारी २२०१६ मध्ये एका कारखान्यात बेछूट गोळीबार करण्यात आला होता. एका कारखान्यात बंदूकधाऱ्याने तीनजणांना ठार केले व नंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. या हल्ल्यात इतर १४ जण जखमी झाले होते. एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीत काम करणाऱ्या एकाने हा हल्ला केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली होती.