तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू आता एक रहस्य बनले आहे. ५ डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नईतील अपोलो रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अण्णा द्रमूककडूनही त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण जाणून घेण्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती. सुमारे ३ महिन्यापर्यंत जयललिता यांच्यावर अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांचा मृत्यू होऊन ९ महिने झाल्यानंतर तामिळनाडूतील इ पलानीसामी सरकारने याप्रकरणी चौकशी आयोग स्थापन केला आहे. निवृत्त न्यायाधीश ए अरूमुगासामी यांच्या नेतृत्वाखालील आयोग न्यायालयीन चौकशी करेल.

यापूर्वी उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेलवम यांनीही अनेकवेळा जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. जयललितांच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नव्हती. त्यांच्या निकटवर्तीय शशिकला याच रूग्णालयात त्यांच्याजवळ असत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे वनमंत्री सी श्रीनिवासन यांनी जयललिता यांच्या प्रकृतीबाबत आम्ही त्यावेळी खोटी माहिती दिली होती, अशी धक्कादायक कबुली दिली. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या तब्येतीबाबत आम्हाला खोटे बोलायला पक्षाकडून सांगण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. जयललिता यांनी इडली खाल्ली, आम्ही त्यांना भेटलो त्यांची प्रकृती आधीपेक्षा सुधारते आहे, हे सगळे आम्हाला सांगायला सांगितले होते. आम्ही त्यावेळी खोटे बोललो होतो. जयललिता यांना भेटण्याची संमती कोणालाही देण्यात आली नव्हती हेच सत्य आहे. मी तुम्हा सगळ्यांशी खोटे बोललो, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो असेही श्रीनिवासन यांनी म्हटले होते.