पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात ‘राम नामा’चा जप करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राम नामाचा धावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. १२ जानेवारी रोजी कन्याकुमारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी श्रीरामाच्या नावाचा धावा केला होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

 

congress-ec

कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात १२ जानेवारी रोजी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित केले होते. या कार्यक्रमात भगवान श्रीराम, अयोध्या, राम राज्य, हनुमानजी आणि भरत आदींच्या नामाचा जप करून मोदी यांनी धर्माच्या नावाखाली निवडणूक प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दामहून श्रीराम, हनुमान आणि इतर देवांच्या नावांचा वारंवार उल्लेख केला आहे. सरकारने राबवलेल्या धोरणांची तुलना भगवान श्री राम यांच्याशी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्माशी जोडून संबोधन करून एकप्रकारे निवडणूक प्रचारच केला, असा काँग्रेसचा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार केली होती. देव आणि संताच्या प्रतिमांकडे पाहिल्यास त्यात मला ‘हात’ दिसत असल्याचे राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते.