‘निवडणूकांपूर्वी काँग्रेस पक्षाचे लोक पक्ष सोडून भाजपात दाखल झाले यावर त्यांनी आपले आत्मपरिक्षण करावे. ज्यांच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे भष्टाचारी काँग्रेसचे लोक गुजरातचे काय भले करणार, उलट ते गुजरातमधल्या आमच्याच विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. जनतेला अशा प्रकारे भ्रमित न करता त्यांनी विकासाच्या मुद्दावर निवडणूक लढवून दाखवावी’ असे आव्हान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज तोफ डागली. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान, गांधीनगरमध्ये आयोजीत गुजरात गौरव महासंम्मेलनात ते बोलत होते.

आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, ‘भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे सामर्थ्य मी चांगल्या प्रकारे जाणतो. देशातील विविध भागात भाजप कार्यकर्त्यांवर अनेक अत्याचार झाले तरी ते समोरुन लढा देत होते’ काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, ‘ते वंशवादाचे राजकारण करीत आहेत तर आम्ही आमच्या पुर्वजांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहोत. काँग्रेस पक्षाने देशाला आजवर अनेक मुख्यमंत्री, नेते दिले, मात्र आता त्यांनी आपले लक्ष्य केवळ खोटे बोलण्यावर केंद्रीत केले आहे. ते केवळ निराशावादी वातावरण निर्माण करण्याचे काम करीत आहेत.’

‘गुजरातचा विकास कायमच गांधी घराण्याच्या आणि काँग्रेसच्या डोळ्यात सलतो आहे. त्यांनी सरदार पटेलांसोबत काय केले हे इतिहास जाणतो. त्यामुळे आता त्यांच्या कुठल्याच गोष्टींची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी विकासाला शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाच्या मनात विकासाबाबत द्वेष आहे. त्यामुळे भाजप काँग्रेसला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे.’ असे मोदी यावेळी म्हणाले.

‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आपल्याकडे देशाची पूर्ण सत्ता होती त्यावेळी तुम्ही माझ्याविरोधात अनेक षडयंत्र रचले’ असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला. निवडणुका लढवण्यासाठी सांप्रदायिकवाद, जातीयवाद आणि लोकांची दिशाभूल करणे ही काँग्रेसची हत्यारे आहेत. मला तुरुंगात टाकण्याचे आपण ठरवले होते. जोपर्यंत अमित शहांना तुरुंगात नाही टाकले जात नाही तोपर्यंत मोदी पर्यंत पोहोचता येणार नाही’ असे त्यांना वाटत होते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला केला.

देशात आज खरेपणा पुढे आल्याने आज आम्ही कुठे आहोत आणि तुम्ही कुठे आहात? असा सवाल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जीएसटीचा निर्णय घेण्यामध्ये काँग्रेसही बरोबरीचा भागीदार आहे. त्यामुळे त्यांनी खोटेपणा पसरवू नये. निवडणुका आमच्यासाठी विकासवादाची लढाई आहे तर काँग्रेससाठी ही वंशवादाची लढाई आहे. त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की, या लढाईत विकासवादाचाच विजय होणार आहे.’