गुजरातमध्ये वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच अनुषंगाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. सोमवारी नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे. अशातच सकाळीच ‘हवामान अंदाज- निवडणुकांच्या आधी होणार आश्वासनांचा पाऊस’ अशा आशयाचे खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता भाजप विरूद्ध काँग्रेसच्या सामन्यासोबतच ‘नमो’ विरूद्ध ‘रागा’ अशीही लढाई रंगताना मिळते आहे. याच निवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडताना दिसत नाहीत. तर राहुल गांधी यांच्यावर भाजपचे सगळेच नेते टीका करताना दिसत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरात मॉडेल समोर ठेवून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचमुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील विविध योजनांची सुरूवात करण्याची शक्यता आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातमधील १२ हजार ५०० कोटींच्या पायाभूत योजनांच्या प्रकल्पांचा शुभारंभ आज करण्यात येईल. ५५० कोटी रूपयांचे बजेट असलेल्या ‘गरीब कल्याण मेला’ या फेरी बोट सर्व्हिसचेही अनावरण आज होण्याची शक्यता आहे. ही योजना पोरबंदर या ठिकाणी सुरू होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी रविवारीच गुजरातच्या विकासासाठी ८०० कोटी रूपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली. या विविध प्रकारच्या घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवरच राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

रविवारीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासंबंधीच्या ट्विटवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा ‘हवामान अंदाज…’ अशी सुरूवात करून त्यांनी घोषणांचा पाऊस पडेल असे म्हणत भाजपला चिमटा काढला आहे. याला आता भाजप नेत्यांकडून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कसे उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.