‘इकडचा’ वर ‘पलीकडील’ वधूच्या विवाहबंधनात!
दहशतवादी बुऱ्हान वानी याला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराने धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये दोन देशांच्या नियंत्रण रेषेचे ‘सीमोल्लंघन’ करून दोन जीव विवाहबद्ध झाले आहेत. काश्मीरमधील एका तरुण पोलीस उपनिरीक्षकाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुलीशी जन्मभराची गाठ बांधली आहे.
जम्मू व काश्मीर पोलिसांत उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेला ओवैस गिलानी याचा विवाह पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद येथील फैझा गिलानी हिच्याशी येथे एका समारंभात संपन्न झाला. काश्मीरमधील सध्याच्या संघर्षांच्या परिस्थितीमुळे या वेळी फक्त वराचे जवळते नातेवाईक आणि मित्र हजर होते.
गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या अशांततेमुळे काश्मीर खोऱ्यातील जनजीवन ढवळून निघाले असताना आणि पोलिसांना निदर्शकांच्या संतापाची धग सोसावी लागली असताना हा विवाह समारंभ येथील एका हॉटेलमध्ये धार्मिक विधींसह संपन्न झाला. वर आणि वधूपक्ष एकमेकांचे नातेवाईक असून देशाच्या विभाजनाच्या वेळेस ते एकमेकांपासून दूर गेले होते.
या दोघांचा ‘निकाह’ २०१४ साली मुझफ्फराबाद येथे पार पडला होता. त्या वेळी नवऱ्या मुलाचे वडील शाबीर गिलानी हे त्यांच्या विभाजित कुटुंबाला भेटण्यासाठी श्रीनगर व मुझफ्फराबाद दरम्यानच्या ‘कारवाँ-ए-अमन’ या बससेवेने पाकव्याप्त काश्मीरला गेले होते.
काश्मीर खोऱ्यातील सद्य:स्थितीमुळे पाकव्याप्त काश्मीरला जाणारी बससेवा अनेक दिवस स्थगित ठेवण्यात आल्याने लग्नसमारंभ अनेकदा रद्द करावा लागला होता. अखेरीस ही बससेवा पुन्हा सुरू झाली, तेव्हा वधू व तिचे जवळचे कुटुंबीय सोमवारी लग्नसमारंभासाठी येथे आले, असे २०१४ साली पोलीस अधीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या गिलानी (सीनियर) यांनी पीटीआयला सांगितले.
इस्लामाबादच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मॉडर्न लँग्वेजेसमधून शिक्षण, नियोजन आणि व्यवस्थापन विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या फैझाशी ओवैस याचा विवाह सोहळा मंगळवारी संपन्न झाला. नवऱ्या मुलाचे वडील नियंत्रण रेषेजवळील कर्नाह गावचे मूळ रहिवासी आहेत. १९४७ साली भारत-पाकिस्तानच्या युद्धामुळे ताटातूट झालेल्या मुझफ्फराबाद येथील आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आपण आतुर होतो आणि त्यातूनच आपल्या मुलाचे पाकव्याप्त काश्मीरमधील मुलीशी लग्नाचा विषय पुढे आला, असे सांगून त्यांनी या घडामोडीची पाश्र्वभूमी सांगितली. ‘१९४७ साली आमच्या कुटुंबाची ताटातूट होऊन फक्त माझे वडील सीमेच्या या बाजूला राहिले, तर उरलेले कुटुंब पलीकडच्या बाजूला निघून गेले. आमची बहुतांश जमीन आणि मालमत्ता मुझफ्फराबादमध्ये आहे. खरे तर कर्नाह हा १९४७ पर्यंत मुझफ्फराबादचाच भाग होता.’
‘माझ्या वडिलांकडून मी माझे आजोबा आणि इतर नातेवाईकांबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. माझे आजोबा मरण पावले, तेव्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून जाण्यास परवानगी नसल्यामुळे माझे वडील त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे माझ्या आजोबांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी जाण्याची माझी इच्छा होती.’
पाकव्याप्त काश्मिरात गेले असताना गिलानी यांनी आपल्या विभाजित कुटुंबाला जवळ आणण्याची आवश्यकता जाणवली व त्यातून त्यांनी ओवैस आणि फैझा यांची जोडी जुळवण्याचा प्रस्ताव ठेवला. मी ओवैसला फोनवर विचारले असता त्याने संमती दिली आणि आम्ही ‘निकाह’ आटोपला,’ असे गिलानी यांनी सांगितले. आपल्या मुलाच्या विवाहासारखे आणखी विवाह झाले, तर जम्मू- काश्मीरचे विभागलेले भाग एकमेकांच्या जवळ येण्यास मदत होईल, अशी आशा गिलानी यांनी व्यक्त केली. नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकांनाच दोन देशांमधील संघर्ष आणि कटुता यांचा सगळ्यात मोठा फटका सहन करावा लागला आहे. नियंत्रण रेषेनजीकचे सर्व पारंपरिक मार्ग खुले केले, तर लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढेल आणि दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतील, असेही ते म्हणाले.