लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिवंगत साडू सुरेंद्र कुमार बन्सल यांच्या घरावर छापा टाकला. दिल्लीतील पीडब्ल्यूडी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यावेळी बन्सल यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, बन्सल यांचे दि. ७ मे रोजी हृदयविकाराने निधन झाले आहे. या प्रकरणात बन्सल यांचे नाव घेतल्याने आम आदमी पक्षाने याचा निषेध केला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीने बन्सल यांच्या घरातून पीडब्ल्यूडी घोटाळ्याशी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली आहेत. परंतु, एसीबीकडून याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

काय आहे पीडब्ल्यूडी घोटाळा ?
काही दिवसांपूर्वी या कथित घोटाळ्याप्रकरणी एसीबीने तीन वेगवेगळे प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवले होते. यामध्ये सुरेंद्र कुमार बन्सल यांच्या कंपनीच्या नावाचाही समावेश होता. हे एफआयआर रोड्स अँटी करप्श्न ऑर्गनायजेशनचे संस्थापक राहुल शर्मा यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये दिल्लीतील रस्ते आणि गटारीचे कंत्राट देताना घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या कामासाठी सुमारे १० कोटी रूपयांचे बिल मंजूर करण्यात आले होते. जे काम पूर्ण झालेले नाही. त्याचे बनावट बिल देण्यात आल्याचे तसेच ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत. अशा कंपन्यांच्या नावेही बिल काढण्यात आल्याचे एसीबीला आपल्या तपासात आढळून आले आहे.

केजरीवाल आणि पीडल्ब्यूडीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी बन्सल यांना कंत्राट देण्यासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप शर्मा यांनी केल्याचे एसीबीचे प्रमुख मुकेशकुमार मीना यांनी सांगितले. परंतु, प्राथमिक तपासात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता.