एकपक्षीय पद्धतीच चीनसाठी लाभदायक असून बहुपक्षीय लोकशाही पद्धती चीनला मानवणारी नाहीच, असे ठाम प्रतिपादन अध्यक्ष शी झिन्पिंग यांनी आपल्या पहिल्या युरोप दौऱ्याच्या समारोप कार्यक्रमात केले.
या आठवडाभराच्या दौऱ्याची समाप्ती बेल्जियममधील कॉलेज ऑफ युरोप या महाविद्यालयातील भाषणाने झाली. तेथे विद्यार्थ्यांसमोर बोलताना, इतर देशांच्या राजकीय पद्धतीचे वा विकास पद्धतीचे अनुकरण चीन करू शकणार नाही. एक तर ती पद्धती आम्हाला मानवणार नाहीच, उलट तिचे विपरीत परिणाम होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीचे फळ वरून दिसायला सारखेच असेल पण त्याची चव वेगळी असू शकते, असे उद्गारही त्यांनी काढले.
चीनची संस्कृती, इतिहास आणि परिस्थिती यातील वेगळेपणातूनच आमच्या विकासाचा मार्ग आम्ही तयार केला आहे. त्याच मार्गाने आम्ही जाणे गरजेचे आणि आमच्या हिताचे आहे. या एकपक्ष पद्धतीमुळेच आम्ही अभूतपूर्व यश मिळविले आहे, असेही ते म्हणाले.
चीनने आजवर अनेक राजकीय पद्धतींचा अनुभव घेतला आहे. आमच्यावर हजारो वर्षे राजेशाहीचा अंमल होता. सन यत्-सेन यांनी १९११च्या क्रांतीद्वारे ती राजेशाही उलथवून टाकली. प्राचीन काळापासून आजवर आम्ही घटनात्मक राजेशाही, संसदीय पद्धती, बहुपक्षीय पद्धती अशा अनेक तऱ्हेच्या राजकीय पद्धतींचा अनुभव घेतला आहे. अखेरीस आम्ही समाजवादाच्या वाटेवर आलो आणि आम्ही काही यशस्वी प्रयोग केले तसेच चुकाही केल्या.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे संस्थापक माओ शेडाँग यांच्या सांस्कृतिक क्रांतीत लाखो लोक मारले गेले होते, त्याचा उल्लेख न करता शी म्हणाले की, काही वेळा आमच्या देशाला मोठा हादराही बसला. मात्र डेंग शिओपिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशहिताचे भान न सोडता सुधारणा आणि खुली अर्थव्यवस्था हा कालसंगत पर्याय स्वीकारला. त्यानंतर विकासाचा आमचा मार्गच आम्ही तयार केला. आर्थिक सुधारणांची कास चीन सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.