विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही नेमक्या कोणत्या पक्षाशी युती करावी याचे उत्तर अद्याप भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये मिळालेले नाही. नॅशनल कॉन्फरन्सने भाजपशी युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तर काँग्रेसने मुफ्ती मोहंमद सईद यांनाच आपली पसंती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘किंगमेकर’ होण्याएवढे संख्याबळ असूनही भाजपसमोरील पेच कायम आहे आणि त्यामुळेच या राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत.
नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागा मिळाल्या असून त्यांच्या मदतीने सरकार स्थापण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी रात्री मावळते मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. मात्र भाजपच्या गोटातून हे वृत्त फेटाळण्यात येत आहे. अब्दुल्ला यांनी ‘राजकारण म्हणजे सर्व शक्यतांची कला’ हे वचन सार्थ ठरविताना पीडीपीलाच पाठिंबा देण्याचे घाटले आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सच्याच एका ज्येष्ठ नेत्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. तसा प्रस्ताव पीडीपीकडे पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून उत्तराची प्रतीक्षा आहे, असे या नेत्याने सांगितले.दरम्यान, इंग्लंडमधील आपल्या आजारी पालकांना भेटण्यासाठी जाणे आपण रद्द केलेले नसून, २७ डिसेंबरला आपण रवाना होत असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले.
भाजपसमोरही पेच
जम्मू-काश्मीरमध्ये कुणीही सरकार स्थापन केले तरी त्यात भाजपची ‘महत्त्वाची’ भूमिका असेल आणि त्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, असे विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अरुण जेटली यांनी सांगितले. राष्ट्रीय सार्वभौमत्व बळकट करणे, विकास आणि प्रादेशिक समतोल यासाठी सरकार स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
काँग्रेसची मुफ्ती मोहम्मद यांना पसंती
निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचा आदर राखत सरकारचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसने पीपल्स डेमॉकॅट्रिक पार्टीचे (पीडीपी) प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांना पसंती दिली आहे. सत्ताआतुर राजकीय गट व व्यक्ती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही स्थिती चिंताजनक असल्याचे राज्याचे प्रदेश काँग्रेसाध्यक्ष सैफुद्दीन सोझ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सईद यांच्यासारख्या नम्र, अनुभवी नेत्याला इतर समविचारी पक्ष वा गट यांच्या पाठिंब्याने आघाडीचे नेतृत्व करू दिले जावे, असे ते म्हणाले.