इ. पलानीस्वामी यांनी तामिळनाडूमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विरोधीपक्ष नेते एम. के. स्टालिन हे उपोषणासाठी बसले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर डीएमके कार्यकर्त्यांनी निदर्शनांना सुरुवात केली आहे. मरीना बीचजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. काही कार्यकर्त्यांसोबत स्टालिन हे गांधी पुतळ्याजवळ उपोषणास बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची लवकर सुटका केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यभरात डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. चेन्नई-बंगळुरू महामार्गावर कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. सभापती धनपाल यांचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला. चेन्नईमध्ये देखील डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गोंधळ केला. माजी महापौर सुब्रमणियन यांनी सरदार पटेल रोडवरील वाहतूक थांबवली. कोइम्बतूर येथे ही कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहामध्ये गोंधळ उडाला. त्या गोंधळादरम्यान आपल्याला मारहाण करण्यात आली आणि माझा शर्ट फाडण्यात आला असे स्टालिन यांनी म्हटले. हा लोकशाहीला काळिमा फासणारा दिवस आहे असे स्टालिन यांनी म्हटले.