अमेरिका आणि चीनने त्यांचा देश सांभाळावा, पाकिस्तानसोबत आम्हाला तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही. सीरिया, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? फारुख अब्दुल्लांना जम्मू-काश्मीरची अवस्था त्या देशांसारखी हवी आहे का असा सवाल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारताने चीन किंवा अमेरिका या देशांची मदत घ्यायला हवी असे म्हटले होते. सैन्याद्वारे या वादावर तोडगा निघू शकत नाही. पाकिस्तानसोबत चर्चा हा एकमेव पर्याय भारतासमोर असून चर्चेत मध्यस्थ म्हणून चीन किंवा अमेरिकेची मदत घेता येईल असे त्यांनी म्हटले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. फारुख अब्दुल्ला यांच्या विधानावर शनिवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली. अमेरिका आणि चीनच्या मध्यस्थीची गरज नाही. आम्हाला पाकसोबत चर्चा करण्यासाठी अमेरिका, तुर्की किंवा यूरोपची गरजच काय असा सवाल त्यांनी विचारला. अमेरिकेने हस्तक्षेप केलेल्या सीरिया, अफगाणिस्तान आणि इराकमधील सद्य परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. फारुख अब्दुल्ला यांना या देशांसारखी स्थिती जम्मू- काश्मीरमध्ये हवी का असा सवाल विचारत मुफ्तींनी अब्दुल्ला यांच्यावर पलटवार केला.

दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली होती. चीननेही मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. आता आपण कोणाची तरी मदत घेऊन पाकिस्तानसोबत चर्चेला सुरुवात करावी आणि कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी अब्दुल्लांनी केली होती. मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाही असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नेहमी सांगायचे अशी आठवणही त्यांनी करुन दिली. अब्दुल्ला यांच्या विधानावर भाजपनेही टीका केली होती. अब्दुल्ला यांचे विधान निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री असताना अब्दुल्ला हे पाकिस्तानसोबतच्या युद्धाचे समर्थन करायचे, मग आता दुटप्पी भूमिका का असा सवाल जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी विचारला होता.