वीस वर्षांमध्ये प्रथमच अमेरिकेच्या अध्यक्षांकडून इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात इफ्तारची दावत दिली जाणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्याकडून शनिवारी (२४ जून) एक पत्रक काढण्यात आले होते. या माध्यमातून ईद उल-फितर साजरा करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान महिना संपतो, त्यादिवशी मुस्लिम समुदायाकडून ईद साजरी केली जाते. व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी इफ्तार दावतचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा ट्रम्प यांच्याकडून इफ्तारचे आयोजन करण्यात आलेले नाही.

‘संपूर्ण जगभरातील मुस्लिमांसोबतच अमेरिकेतील मुस्लिम रमजानच्या पवित्र महिन्यात दान आणि पुण्य करतात. आता मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत ईद साजरी करत आहेत आणि शेजारच्या लोकांसोबत इफ्तार दावतची परंपरा अद्याप कायम आहे,’ असे निवेदन डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्याकडून जारी करण्यात आले होते. मात्र या निवेदनात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसवर इफ्तार दावतच्या आयोजनाबद्दलचा उल्लेख केलेला नाही. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची इफ्तार दावतची प्रथा मोडल्याबद्दल अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी इफ्तार देण्याची प्रथा सुरु केली. यानंतर जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बराक ओबामा यांनी इफ्तार दावत देण्याची परंपरा कायम राखली. अमेरिकेच्या अध्यक्षांकडून दिल्या जाणाऱ्या इफ्तार दावतमध्ये अमेरिकेतील प्रमुख मुस्लिम व्यक्तींमत्त्वांसोबतच अन्य मुस्लिम देशांमधील महत्त्वपूर्ण लोकदेखील सहभागी होतात. अमेरिकेन गृह मंत्रालयाकडून ईदनिमित्त गेल्या दोन दशकांपासू इफ्तार दावतचे आयोजन केले जात आहे. मात्र ट्रम्प यांनी या इफ्तार दावतचे आयोजन केलेले नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी इस्लाम आणि मुस्लिमांविरोधात प्रचार केला होता. याबद्दल ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका करण्यात झाली होती. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांमधील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली होती. अमेरिकेतील न्यायालयांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांना स्थगिती दिली होती. मशिदींमधून होणारा दहशतवादाचा प्रसार याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानांमुळे ट्रम्प अनेकदा वादात सापडले आहेत.